दाढी ठेवणे किंवा वाढविणे हे एकेकाळी गबाळेपणाचे अथवा ती व्यक्ती दु:खात अथवा विवंचनेत असल्याचे निदर्शक मानले जात होते. आता तो ट्रेंड पूर्णपणे बदलला असून दाढी-मिशा हे रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. इतकेच नव्हे तर, त्याच्या रचनेतही वैविध्य आले आहे. त्यातच सध्या अनेक सेलिब्रिटी कलाकार, खेळाडू दाढी राखण्यावर भर देत असल्याने तरुणांमध्ये याची क्रेझ आणखी वाढली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील शिखर धवन, विराट कोहली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे असा क्रिकेट संघ.. शहेनशहा अमिताभ बच्चन.. बाजीराव मस्तानीमधील रणवीर सिंग.. ‘एअरलिफ्ट’ चित्रपटातील अक्षय कुमार.. इमरान हाश्मी, सैफअली खान, शाहीद कपूर, फरान अख्तर, सलमान खान, आर माधवन्.. आपापल्या क्षेत्रात नाव कमावून असंख्य चाहत्यांच्या गळय़ातील ताईत बनलेल्या या नामवंतांमध्ये सध्या दिसणारी समान गोष्टी कोणती?
या साऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर तो समान धागा नक्कीच लक्षात येईल. यातील प्रत्येकानेच दाढी-मिशा राखल्या आहेत. अर्थात प्रत्येकाच्या दाढीची स्टाइल वेगळी आहे. त्यामुळे त्यांचा लूक अधिक खुलून दिसतो. एकेकाळी ‘क्लीन शेव्हड’ राहणं पुरुषांसाठी फार महत्त्वाचं मानलं जात होतं. गालावर वाढत असलेले दाढीचे छोटे खुंटही ताबडतोब हटवले जात होते. पण आज हे चित्र पूर्णत: बदलले आहे. अलीकडच्या काळात दाढी ही ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनू लागली आहे. केवळ सेलिब्रिटीजच नव्हे तर सर्वसामान्य तरुण मुलंही दाढी-मिशा ठेवण्याकडे भर देऊ लागली आहेत.
क्रिकेट आणि बॉलीवूड चित्रपटांचा प्रभाव भारतीयांवर सुरुवातीपासूनच राहिला आहे. त्यामुळे या क्रिकेट खेळाडू आणि बॉलीवूड अभिनेत्यांच्या वेशभूषा आणि केशभूषांची नक्कल करून त्यांच्यासारखे दिसण्याचा प्रयत्न अनेक युवक करताना दिसतात. गेल्या काही दिवसांमध्ये हा ट्रेंड कमालीचा वाढला असून पूर्वी एखाद दुसऱ्या चित्रपटात दिसणारी केशभूषा, दाढी आणि मिशीचा स्टायलिश लुक आता प्रत्येक सिनेमामध्ये येऊ लागला आहे. त्यामुळे सिनेतारकांचे हे आकर्षक अवतार तरुणांना आकर्षित करू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये आलेल्या बॉलीवूड चित्रपटांतील सिनेअभिनेते आणि टी-२०, आयपीएलपासून ते प्रो-कबड्डीच्या खेळाडूंपर्यंतच्या प्रत्येकाच्या दाढी-मिशांच्या स्टाइल्स तरुणाईने धडाधड कॉपी करून प्रचलित केल्या आहेत. खास करून थंडीच्या नोव्हेंबर महिन्यापासूनच ‘नो शेव्ह’ हा ट्रेंड तरुणांमध्ये ठरलेला असतो. पुढे तो जूनपर्यंत कायम राहतो. या ट्रेंडच्या नावाखाली दाढी वाढवणारे तरुण याच वाढत्या दाढीची स्टाइल करवून घेताना दिसून येत आहेत. त्यासोबतच नव्या लुकला सूट होणारी हेअर स्टाइल करून घेण्यालाही प्राधान्य दिले जाते.
दाढी वाढविणे हे आजकाल मुलांमध्ये फार लोकप्रिय झाले आहे. पण दाढी वाढवण्यासाठी आणि ग्रुमिंगसाठी, चेहऱ्याच्या मऊपणाकडे थोडे लक्ष देणे, भरपूर सराव आणि चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही सारटोरिअल स्टाइल असो, गोटी स्टाइलची दाढी नक्कीच वेगळेपणा, आत्मविश्वास आणते आणि स्वत:ला व्यक्त करण्यासाठी हा एक वेगळा मार्गही असू शकतो.
महाराज शेव्हिंग कट
ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची भुरळ असलेल्या तरुणांना प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढी-मिशांसारखा प्रकार भलताच आवडतो. बॉलीवूड अभिनेते आणि खेळाडूंच्या दाढीच्या स्टाइल पूर्वी हा शेप भलताच लोकप्रिय ठरत होता आणि आजही त्याचे आकर्षण कायम आहे. वाढलेल्या दाढीला अनेक जण चक्क शिवाजी महाराजांच्या दाढीप्रमाणे सेट करतात. दाढीसोबत केसही वाढवत अनेक जण वेगळी हेअर स्टाइल करतात. केवळ दाढी आणि केसच नव्हे तर कपाळावर चंद्रकोरीचा टिळाही तितकाच ट्रेंडमध्ये आहे. वाढलेली दाढी, चंद्रकोर यावर फोटोशूट करत सध्या सोशल मीडियावर अशा फोटोंना लाइक्स मिळत आहेत. तरुण पिढी याला ‘महाराज शेव्हिंग कट’ म्हणून ‘फॉलो’ करत आहेत.
‘मुछ नही तो कुछ नही’
रणवीर सिंगच्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील बाजीराव या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची भुरळ तरुणाईला पडली असून बाजीरावांप्रमाणे मिशा ठेवण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साइटवर धारदार मिशांचे फोटो अपलोड करून ‘मुछ नही तो कुछ नही’ असे स्टेट्सही ठेवले जात आहेत. रणवीर सिंगच्या बाजीराव मस्तानीबरोबरच रामलीला चित्रपटातील त्याच्या दाढी-मिशांच्या लुकची चर्चाही मोठय़ाप्रमाणात झाली होती. हा लुक अधिक भारदस्त दिसण्यासाठी रणवीरने व्यायामशाळांमध्ये जाऊन शरीरालाही आकर्षक आकार देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक भारदस्त दिसत होते. त्यामुळे तरुणांना त्याचा हा अवतार विशेष आकर्षणाचा ठरला होता. यापूर्वी आलेल्या सिंघम आणि दबंग सिनेमातील चित्रपटातील अजय देवगन आणि सलमानप्रमाणे मिशा ठेवण्याचा ट्रेंडही रुजला होता. वजीरमधील फरहान अख्तर याने सिंघम मधील मिशांचा ट्रेंड पुढे चालवला आहे. तर शाहीद कपूरनेही पीळदार मिशांचा ‘सोल्जर’ अवतार तरुणांपुढे ठेवला आहे.
मस्केटीयर स्टाइल..
‘फॉर्मल लुक’साठी तुकतुकीतपणाबरोबर तीक्ष्ण, टोकदार गोटी स्टाइल दाढी आणि टोकदार मिशा ठेवल्या जातात. यामध्ये मिशा आणि गोटी स्टाइल दाढी जुळवण्याची आवश्यकता नसते. मात्र या स्टाइलची उच्चप्रमाणात देखभाल करण्याची आवश्यकता असते. अभिनेता धनुष या स्टाईलची दाढी प्रामुख्याने ठेवत असून त्याचा हा लूक तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
व्हॅन डिक लूक
‘अँटनी व्हॅन डिक’ या कलाकाराच्या प्रसिद्धीनंतर ही स्टाइल प्रसिद्ध झाली. जाडसर मिशांबरोबर फार जाड गोटी स्टाइल दाढीचा समावेश यात केला आहे. आपण मिशा संपतात, तिथे शेवटी आणि हनुवटीवरील छोटी टोकदार दाढी वरच्या दिशेने पीळ देऊ शकतात. या लुकमध्ये नियमित देखभाल कमी प्रमाणात ठेवली तरी चालते, परंतु आपल्याला रोज सकाळी ही स्टाइल करावी लागते. अमिताभ बच्चन यांच्या दाढीला हा शेप असून अनेक व्यक्ती हा लुक अवलंबताना दिसतात.
सोल पॅच..
याला ‘मॉचे’ असेही म्हणतात, सोल पॅचचा स्वत:चा असा एक स्वत:चाच वर्ग आहे. चेहऱ्याच्या निमुळत्या मध्यभागी खाली आणि हनुवटीवर चेहऱ्याच्या कंसांचा पातळ पॅच ठेवला जातो. हे तोंडाच्या कोपऱ्याचे केस अरुंद किंवा रुंद करणे हे संपूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. ‘दिल चाहता है’ या चित्रपटातील आमिर खानच्या या स्टाइलने तरुणाईला आकर्षित केले होते.
वाइल्ड वेस्ट स्टाइल..
ही गोटी स्टाइल दाढी जाड आणि भारदस्त आहे. जाड पसरट गोटी स्टाइल दाढी जड पीळदार मिशांबरोबर जोडलेली आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये लोकप्रिय असलेली ही एक स्टाइल आहे. इम्रान हाश्मी ही स्टाइल जास्त प्रमाणात करत असल्याने याकडे तरुण वळत असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा