जेवण वाढण्यास नकार दिल्याने राग येऊन पतीने आपल्या पत्नीला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे. त्यावेळी मुलालाही दुखापत झाली असून दुखापतग्रस्त बहिणीला दवाखान्यात नेणाऱ्या मेव्हण्यालाही या महिलेच्या पतीने मारहाण केली. पत्नीला चाकू दाखवत जीवे ठार मारण्याची धमकीही या पतीने दिली असून याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात नाना भोईर चाळीत फिर्यादी अधिरा पाटील पती दिलीप पाटील यांच्यासोबत राहतात. 5 सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दिलीप भोईर यांना त्यांची पत्नी अधिरा पाटील यांनी जेवण वाढण्यास नकार दिला. याचा राग येऊन दिलीप पाटील यांनी अधिरा पाटील यांना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी तसेच झाडू व लागण्याने मारहाण केली. यावेळी त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला दुखापत झाली. यावेळी त्यांचा मुलगा हर्ष यालाही ढकलून दिल्याने तो खाली पडला आणि त्याच्या उजव्या पायाच्या मांडीला मुक्का मार लागला.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत ११ हजार गौरी-गणपतींचे विसर्जन

यावेळी अधिरा पाटील यांचे बंदु ईश्वर जलवानी हा त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना आरोपी दिलीप पाटील यांनी त्यालाही शिवीगाळ करत हाताबुक्क्याने मारहाण करत दुखापत केली. तसेच यावेळी उजव्या हाताला चावाही घेतला. हे होत असताना दिलीप पाटील यांनी स्वतःजवळ असलेला चाकू पत्नी अधिरा पाटील यांना दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिरा पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिलीप पाटील यांच्याविरूद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader