शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभाग आणि डोंबिवलीतील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ठाकुर्लीतील चोळे गाव येथील तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले. तलावाचे सुशोभिकरण करण्यात आल्याने परिसरातील नागरिक या भागात फिरण्यासाठी येतील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>>कल्याण मध्ये मैत्रिणीच्या वादातून अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण
कल्याण डोंबिवली पालिका घनकचरा विभाग, श्री लक्ष्मी नारायण ट्रस्ट, उर्जा फाऊंडेशन, पर्यावरण दक्षता मंडळ, स्वच्छ डोंबिवली अभियान या संस्था कार्यकर्त्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. चोळे तलावा भोवती नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्याने याठिकाणी निर्माल्य, कचरा, हार फुलांचे ढीग पडलेले होते. अनेक नागरिक तलावात निर्माल्य टाकत असल्याने तलावाचे पाणी खराब झाले आहे.
हेही वाचा >>>Video : कधी चौकार, तर कधी षटकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
ठाकुर्ली चोळेगावच्या मध्यवर्ति ठिकाणी असलेल्या या तलावाचे सुशोभिकरण केले तर परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी, सकाळ, संध्याकाळ व्यायाम, योग करण्यासाठी या जागेचा वापर होईल हा विचार करुन घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी चोळे तलावाचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला. नियमित शहर स्वच्छता, शहरांची प्रवेशव्दारे सुशोभित करण्याचा कार्यक्रम विकासकांच्या एमसीएचआय संघटनेतर्फे सुरू आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली, कल्याण मधील तलावांचे सुशोभिकरण करण्याचा आराखडा घनकचरा विभागाचे उपायुक्त पाटील यांनी तयार केला आहे. या प्रस्तावाचा एक भाग म्हणून चोळे गाव तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले, असे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
तलाव परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे. तलावाचे संरक्षित कठडे रंगरंगोटी करुन देखणे करण्यात आले आहेत. तलावात निर्माल्य, घाण टाकू नये यासाठी येथे फलक लावण्यात आले आहेत. निर्माल्य पाण्यात टाकल्याने त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी या भागात एक प्रबोधनात्मक कार्यक्रम पालिकेतर्फे घेण्यात आला.चोळे गाव तलाव सुशोभिकरणाच्या उपक्रमात शंतनु किराणे, रुपाली शाईवाले, विजय घोडेकर, मेघा वैद्य, आदित्य कदम, दिवाकरन नायर, मयुर वैराळे हे कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमात सहभाग घेतला.येत्या काळात चोळे तलावातील घाण, गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेऊन पाणी स्वच्छ ठेवण्यात येईल, असे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले.