हिवाळ्यात मुंबईतील शिवडीच्या खाडीत रोहित पक्षी (फ्लेमिंगो) सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय असतो. सध्या हा केंद्रबिंदू बदलापूर शहराकडे वळला आहे. पश्चिमेकडील वडवली परिसरातही देश-परदेशातून प्रवास करून आलेल्या पक्ष्यांचा डेरा पडला आहे.  यात उंच, ‘पर्पल हेरॉन’ हा बगळा. लांब शेपटीचा ‘ग्रे व्ॉगटेल’ (धोबी पक्षी) हिमालयातून स्थलांतर करून या परिसरात येतो. येथील कीटकांवर त्याचा उदरनिर्वाह चालतो. काळी, पांढरी ‘कॉटन पिग्मी गूज’ अर्थात बदकांचाही यात समावेश आहे. रंगासाठी प्रसिद्ध असलेली ही बदके जोडीने येथे येतात. यांच्यासोबत ‘लाँग टेल श्रायिक’ म्हणजे खाटिक पक्षी हा घाटावरून येणारा पक्षी तर ‘एशियन पाइड स्टर्लिग’ ही काळ्या पांढऱ्या रंगाची मैना येथे वास्तव्यास येतात. संपूर्ण हिवाळाभर हे पक्षी येथे आढळतात आणि त्यानंतर वर्षभर दिसेनासे होतात. सध्या हे पक्षी या तळ्यावर आल्याने शहरातील पक्षी निरीक्षक त्यांना पाहण्यासाठी येथे गर्दी करत आहेत.
या पक्ष्यांचे निरीक्षण आणि अभ्यास करणारे ‘निसर्ग ट्रस्ट संस्थे’चे संचालक ऋतुराज जोशी म्हणाले की, बदलापुरातील या तळ्यावर गेली अनेक वर्षे हे पक्षी येत असून येथील आधिवासात स्वत:ला सामावून घेतात. या देशी पक्ष्यांच्या बरोबरीनेच ‘ब्राँझ विंग्ज जकाना’, ‘लिटील कॉरमोरंट’, ‘लेसार व्हिसलिंग डक्स’, ‘लिटील ग्रेब’, ‘ओपन बील स्टॉर्क’, ‘शिक्रा’, ‘सँड पायपर’, ‘ब्लू किंगफिशर’ असे एकूण ४० जातींचे पक्षी येथे आढळतात. या पक्षांसाठी येथील आधिवास चांगला आहे. परंतु या तळ्याच्या सभोवती मोठय़ा प्रमाणावर इमारतींचे प्रकल्प होत असून येथील निसर्गाला धोका उत्पन्न झाला आहे. तसेच या तळ्याच्या किनाऱ्यावर मंदिर असल्याने नागरिक मोठय़ा प्रमाणावर या तळ्यात निर्माल्य टाकतात.
संकेत सबनीस, बदलापूर

Story img Loader