मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ वाफे येथे राज्य सरकारच्या वन विभागाने हे निसर्ग पर्यटन केंद्र पाच वर्षांपूर्वी तयार केले. शहरी व ग्रामीण जनतेच्या मनात वने, वन्यजीव व निसर्गाविषयी प्रेम जागृत करणे आणि या परिसरातील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या पर्यटन केंद्र स्थापण्याचा मुख्य उद्देश. सिमेंटच्या जंगलात धकाधकीचे जीवन जगणाऱ्याला हे पर्यटन केंद्र विरंगुळा ठरेल हे या पर्यटन केंद्रात प्रवेश करताक्षणीच जाणवते. या परिसरात ४० एकर क्षेत्रात हे निसर्गसंपन्न पर्यटन केंद्र वसलेले आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या पर्यटन केंद्रात निसर्गाचा आनंद तर लुटता येतोच, पण त्याचबरोबर विविध वनस्पती, वनौषधी यांचीही उपयुक्त माहिती मिळते.
अतिशय स्वच्छ व रमणीय असलेल्या या पर्यटन केंद्रात विविध प्रकारची घरे, तंबू बनविण्यात आलेले आहेत. पर्यटकांना आपण जंगलातच राहत आहोत, असा आभास व्हावा यासारखी रचना या वैशिष्टय़पूर्ण घराची केलेली आहे. प्रत्येक घराचे वैशिष्टय़ वेगवेगळे. काही घरांवर वारली पेंटिग आहे, काही केवळ बांबूंपासून बनविलेली, तर काही एखादे सुंदर झोपडे वाटावे असे. या पर्यटन केंद्रात पूर्वी तरंगता तंबूही होता आणि तो या केंद्राचे खास आकर्षण होता. जमिनीपासून उंच सहा मीटर अंतरावर एका झाडावर तो बांधला होता. अनेक पर्यटकांची राहण्यासाठी या झाडावरील तंबूचीच मागणी होती. मात्र सध्या हा तंबू काढण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक घर वातानुकूलित व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज. त्यामुळे पर्यटकांना तिथे निवास करण्यास आवडते.
विशेष म्हणजे भातसा नदीच्या काठी हे पर्यटन केंद्र उभारण्यात आल्याने तिथे पर्यटकांसाठी खास जलविहाराची आणि साहसी जलक्रीडा प्रकारांचीही सोय करण्यात आलेली आहे. तिथे पर्यटकांसाठी नऊ विविध प्रकारच्या बोटी सज्ज आहेत, त्यामध्ये स्पीड बोट, जेटस्की इंजिन बोट आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पर्यटन केंद्रात विविध वृक्ष आणि त्यांसमोर त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. विविध वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतीही तयार करण्यात आलेल्या आहेत. या पर्यटन केंद्रात असलेल्या कॅन्टिनमधील जेवणही निसर्गाशी नाते सांगणारेच. विशेष म्हणजे प्रदूषणमुक्त असलेल्या या केंद्रात जेवण पत्रावळीवर दिले जाते.
हे पर्यटन केंद्र राज्य सरकारने उभारले असले तरी त्याचे व्यवस्थापन भागदळ या गावाच्या ग्रामस्थांकडे दिलेले आहे. गावातील तरुणांना खास प्रशिक्षण देऊन वन व्यवस्थापन करण्यात येते आणि या पर्यटन केंद्रातून मिळणारा नफा याच गावाच्या विकासासाठी खर्च केला जातो. त्यामुळे या केंद्रामुळे ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध झालेला आहे.
विशेष म्हणजे या पर्यटन केंद्राला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध वनस्पती, झाडे कशी लावावीत, झाडांची पर्यावरणातील महत्त्वाची भूमिका, पॉलिथिनच्या पिशवीत झाडे कशी भरावी, गांडूळ खत, विविध औषधी वनस्पतींचे महत्त्व आदी माहिती दिली जाते. विविध गुणांनी वैशिष्टय़पूर्ण असलेल्या या निसर्ग पर्यटन केंद्रातून आनंदही मिळतो, त्याबरोबरच उपयुक्त माहितीही मिळते.
सहजसफर : निसर्गाच्या सान्निध्यात
निसर्गामध्ये रममाण होणे कुणाला आवडत नाही? खळखळ वाहणारी नदी, हिरवागार डोंगर, घनदाट जंगलातून जाणारी रानवाट..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-06-2015 at 12:13 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beautiful nisarga paryatan kendra at shahapur