ठाणे जिल्ह्य़ातील थितबी पहिले पर्यटन ग्राम; महिनाभरात खुले करणार; पर्यटकांसाठी निवासी व्यवस्था
वाहतूक कोंडी आणि दरड कोसळण्याच्या भीतीमुळे कल्याण-नगर मार्गावरील माळशेज घाटातील पावसाळी पर्यटन धोकादायक आणि त्रासदायक ठरते. त्यामुळे अनेक पर्यटक इच्छा असूनही सह्य़ाद्रीच्या या डोंगररांगांमधील निसर्गसौंदर्यापासून चार हात दूर राहणेच पसंत करतात. मात्र वन विभागाच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या ‘थितबी’ पर्यटन ग्राम प्रकल्पामुळे आता पर्यटकांना अधिकसुरक्षितपणे माळशेजच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येणार आहे. येत्या महिनाभरात घाटाच्या पायथ्याशी हे एक नवे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी खुले होत आहे.
माळशेज घाटाच्या पायथ्याशी थितबी हे आदिवासी गाव आहे. याच गावातून जुना माळशेज घाट मार्ग आहे. कर्जतजवळील खांडस येथून भीमाशंकरला जाण्यासाठी असलेल्या डोंगरवाटेसारखाच हा मार्ग आहे. याच मार्गावर थितबी गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर काळू नदीच्या उगमापाशी वन विभागाने जिल्हा नियोजन विभागाने दिलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून खास पर्यटन ग्राम विकसित केले आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या निवासासाठी स्वतंत्र कक्ष, सामूहिक कक्ष, सभा-संमेलनांसाठी सभागृह, तंबूनिवास तसेच स्वयंपाकघराची व्यवस्था आहे. पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील असणाऱ्या या प्रदेशात माथेरानप्रमाणेच वाहनबंदी आहे. त्यामुळे थितबी गावातच वाहने ठेवून पर्यटकांना पायी या ठिकाणापर्यंत यावे लागणार आहे. या ठिकाणी असलेल्या पायवाटेची डागडुजी वन विभागाने केली आहे. त्याचबरोबर नदीप्रवाहावरील छोटय़ा पुलांची दुरुस्तीही केली आहे.
ट्रेकरसाठीही पर्वणी
माळशेजच्या पायथ्याशी वन विभागाने विकसित केलेल्या या नव्या पर्यटन स्थळामुळे आजवर अस्पर्शित राहिलेल्या येथील निसर्गसौंदर्याचा पर्यटकांचा लाभ घेता येईलच, शिवाय जुना घाट मार्गाचीही दुरुस्ती केल्याने ट्रेकर्सनाही या वाटेने घाट चढणे सोयीचे होणार आहे.
व्यवस्थापनात स्थानिकांचा सहभाग
शासनाने आता पर्यटन व्यवसायातही ग्रामसमित्यांना सहभागी करण्याचे धोरण अवलंबले आहे. अशा प्रकारे विकसित होणारे थितबी हे ठाणे जिल्ह्य़ातील पहिले पर्यटन स्थळ आहे. थितबीतील ग्रामस्थांना रीतसर प्रशिक्षण देऊन त्यांना येथील पर्यटन व्यवसायात सामील करून घेतले जाईल, अशी माहिती टोकावडे विभागाचे वनक्षेत्रपाल तुळशीराम हिरवे यांनी दिली.
कसे जाल?
कल्याण-नगर मार्गावर जिथे माळशेज घाट सुरू होतो, तिथे रस्त्यालगत असणाऱ्या सावर्णे गावापासून थितबी दोन किलोमीटर अंतरावर आहे. गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर हे नवे पर्यटन ग्राम आहे. थितबी गावात स्वागत कक्ष उभारणीचे काम सध्या सुरू आहे. स्थानिक व्यक्तीला सोबत घेऊन आपण या ठिकाणी पोहोचू शकतो.