लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण, दुर्गम भागात ज्ञानदानाचे अतुलनीय काम केले. यामुळे दुर्गम भागातील लाखो विद्यार्थी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आहेत. कर्मवीरांच्या ज्ञानदानाचा हा वसा आम्ही संघटित बळ देऊन, एकत्रितपणे चालवित आहोत, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथील सेंट लॉरेन्स शाळेतील प्रेक्षागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात काढले.

शिक्षणाचे सार्वत्रिकरण हा महत्वाचा विषय आहे. यासाठी अनेकांनी अथक प्रयत्न केले. यामुळे ज्ञानादानाच्या क्षेत्रात आता १०० ते १५० वर्ष काम करणाऱ्या संस्था आहेत. हाच विचार समोर ठेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण गेले पाहिजे या उदात्त विचारातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राज्याच्या ग्रामीण, दुर्गम भागात रयत शिक्षण संस्था काढण्यावर भर दिला. आता या शाळांमध्ये चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ७० हून अधिक महाविद्यालये संस्थेची आहेत. अशाच पध्दतीने असे ज्ञानदानाचे काम करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. ज्ञानदानासाठी समर्पित भावाने काम करणारा एक मोठा वर्ग, संस्था देशात आहेत. अशाच संस्थामधील सेंट लॉरेन्स शाळा आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

आणखी वाचा-ठाणे : शरद पवार यांचा राबोडीत फेरा

राज्याच्या राजकारणात उमेदीच्या काळात आम्हाला कल्याणमधील आ. कृष्णराव धुळप यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत होते. विधानसभेच्या कामात त्यांचे खूप योगदान असे. काही विषयावर माहिती हवी असेल तर आ. धुळप मोलाचे मार्गदर्शन करत होते, अशा जुन्या आठवणींना पवार यांनी उजाळा दिला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आ. डॉ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, सेंट लॉरेन्स शाळेचे अध्यक्ष सिल्व्हीस्टर डिझोझा, जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील उपस्थित होते.