उल्हासनगर : खड्डे, चिखलयुक्त आणि असमान रस्त्यामुळे कल्याण अहमदनगर महामार्गावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. शेकडो विद्यार्थी, हजारो प्रवासी दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करतात. संबंधित महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदाराला सातत्याने विनंती करूनही त्यांनी रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करत या महामार्गावरील वरप येथील सेक्रेड हार्ट शाळेच्या प्रशासनाने पोलीस उपअधिक्षकांकडे उपोषण करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या कामाबाबत नागरिकांत संपात वाढत असल्याचे चित्र आहे.

कल्याण अहमदनगर महामार्गाची गेल्या काही वर्षात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दुरावस्था होते आहे. याची जाणीव कंत्राटदार कंपनीला स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवी संस्थांच्या वतीने करून देण्यात आली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंपनीने याकडे साफ दुर्लक्ष केले. अखेर जून महिन्याच्या अखेरीस या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली. सध्या या रस्त्याची भीषण अवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसात येथून प्रवास करणाऱ्या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण अपघातात जखमी झाले आहेत. या महामार्गावर तालुक्यातील अनेक नामांकीत शाळा आहेत. या वरप आणि कांबा गावातल्या या शाळांमध्ये उल्हासनगर, कल्याण, टिटवाळा, डोंबिवलीपासून हजारो विद्यार्थी शंभरहून अधिक बसमधून येत असतात. रस्त्यामुळे त्यांचाही प्रवासाचा वेळ आणि त्रासात भर पडली आहे. त्यामुळे या शाळांनी आता आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. येथील सेक्रेड हार्ट शाळेच्या वतीने पोलीस उप अधिक्षकांना या रस्त्याविरूद्ध उपोषण करण्याची परवानगी मागितली आहे.

सेक्रेड हार्ट शाळेचे प्रमुख ऍल्बिन ऍन्थोनी यांनी हे पत्र लिहीत कंत्राटदारावर बेजबाबदारपणा आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. गुरूवार २१ जुलै रोजी आम्ही उपोषण करणार असून प्रवासी आणि स्थानिकांचा संताप व्यक्त करण्याची परवानगी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर खड्ड्यांमुळे झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे शाळेच्या तीन नवर्षांनंतरही पहिल्याच पालक सभेला विद्यार्थी आणि पालकांना दीड ते दोन किलोमीटर पायी चालत प्रवास करण्याची वेळ आली होती. तेव्हापासून पालक आणि विद्यार्थ्यांचा रोष शाळेला सहन करावा लागला.