बदलापूर : बदलापुरातून गोमांस विकत घेऊन ते लोकल गाडीने घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. बदलापुरातून सकाळी १० वाजून २६ मिनिटांच्या लोकलने हे गोमांस नेले जात होते. त्यावेळी सहप्रवाशांना उग्र वास आल्याने त्यांनी अधिक तपास केला. त्यावेळी ही बाब उघड झाली. अटक झालेले तिघेही मुंबईचे रहिवासी आहेत, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून १८ किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे.
कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूरहून सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी सुटणारी मुंबई लोकलमध्ये मनोज गौंड हे आपल्या मित्रांसह प्रवास करत होते. त्यावेळी बदलापूर लोकल निघाल्यानंतर काही अंतरावर जाताच लोकलमध्ये उग्र वास येऊ लागला. त्यांनी समोर बसलेल्या प्रवाशांकडे पिशव्यांमध्ये काय आहे याबाबत विचारला केली. त्यावेळी त्या पिशव्यांमध्ये मांस आढळले. हे गोमांस असल्याचा संशय आल्याने गौंड यांनी आपल्या मित्रांसह या तिघांना कल्याण रेल्वे स्थानकात उतरवले. त्यांना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर केले. तेथे अधिक तपास केले असता या पिशव्यांमध्ये गोमांस आढळले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बदलापूर गावातून हे गोमांस घेतल्याची माहिती या तिघांनी दिली. जमाल शेख, रफिक शेख, वाजिद शेख अशी आरोपींची नावे आहेत अशी माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिली आहे. बदलापूरतून विकत घेतलेले हे गोमांस मुंब्रा येथे घेऊन जात असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. तिघेही आरोपी मुंब्रा येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोमासाचे नमुने घेऊन इतर गोमास नष्ट करण्यात आल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली आहे. आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
बदलापुरात गोमांस विक्री ?
लोहमार्ग पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तीन आरोपींनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. आरोपींनी बदलापूर गावातून गोमाज घेतल्याची कबुली लोहमार्ग पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे बदलापुरात गोमासाची विक्री होते की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे विक्रीच्या ठिकाणीही तपास केला जाईल अशी माहिती लक्ष्मण चव्हाण यांनी दिली आहे. या घटनेनंतर बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे.