कल्याण- कल्याण रेल्वे स्थानकातून येजा करणाऱ्या प्रवाशांना दिवसा, रात्री पैशाच्या लालसेपोटी लुटणाऱ्या, महिला प्रवाशांची छेडछाड करणाऱ्या ३१ गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांना कल्याण लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी मंगळवारी रात्री कारवाई करुन रेल्वे स्थानक भागातून अटक केली.दोन दिवसापूर्वी कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळेत कामावर चाललेल्या एका महिलेला एका गर्दुल्ल्याने मिठी मारुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. दिवसा हे गर्दुल्ले प्रवाशांना त्रास देत असतील तर रात्रीच्या वेळेत या गर्दुल्ले, भिकाऱ्यांच्या तावडीत प्रवासी सापडला तर त्याची अवस्था हे गर्दुल्ले काय करणार, असे प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केले होते. या प्रकाराने लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बळाचे जवान कामाला लागले होते.
गर्दुल्ल्याने महिलेशी केलेल्या गैरप्रकाराने उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी रेल्वेच्या वरिष्ठांशी संपर्क साधून डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे स्थानकांवर रेल्वे सुरक्षा बळाचे अस्तित्व आहे की नाही, असे प्रश्न केले होते. यापूर्वीसारखे रेल्वे सुरक्षा बळाचे जवान रेल्वे स्थानकांवर गस्त घालत नसल्याचे अरगडे यांनी रेल्वेच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणले होते. या प्रकारानंतर रेल्वे पोलिसांची यंत्रणा कामाला लागली होती.मनसेच्या कल्याण मधील कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात निदर्शने करुन रेल्वे स्थानक भागात दिवसा, रात्री ठाण मांडून बसणाऱ्या गर्दुल्ले, भिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने रेल्वे स्थानकातील फलाट, स्कायवाॅकवर बसणाऱ्या फेरीवाले, गर्दुल्ले, भिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते.
हेही वाचा >>>ठाणे: नौपाड्यात वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली
गर्दुल्ले विषयावरुन प्रवासी संतप्त झाल्याने त्यांचा आणखी रोष नको म्हणून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, रेल्वे सुरक्षा बळाचे कल्याण विभागाचे प्रमुख राकेश कुमार शर्मा यांनी तपास पथके तयार करुन कल्याण रेल्वे स्थानकात शोध मोहीम राबवून मंगळवारी रात्री १७ भिकारी, १४ गर्दुल्ले असे ३१ जण अटक केले. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. रेल्वे स्थानक परिसरात एकही गर्दुल्ला, भिकारी दिसणार नाही असे नियोजन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.कल्याण रेल्वे स्थानक परिसर गर्दुल्ले, भिकारी मुक्त केल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. अशीच मोहीम आंबिवली, शहाड, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांमध्ये राबविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.