अंबरनाथ: तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर राज्यभरातील शाळा बुधवारी सुरू झाल्या. मात्र अंबरनाथ शहरातील सर्वात पहिली हिंदी भाषिक शाळेची घंटा पहिल्या दिवशी वाजलीच नाही. अंबरनाथ पश्चिम येथील भेंडीपाडा परिसर असलेल्या या शाळेची घंटा, वर्गातील पंखे, पाण्याची मोटार, पाण्याचे मीटर, दिवे असा तब्बल आठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी सुट्टीच्या काळात लंपास केला. त्यामुळे बुधवारी शाळा सुरू झाली असली तरी शाळेची घंटा वाजू शकली नाही.
हिंदी सेवा मंडळाच्या अखत्यारीत असलेली अंबरनाथ पश्चिम येथील भेंडीपाडा परिसरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयाची सुरुवात १९५९ साली झाली. अंबरनाथ शहरातील ही पहिली हिंदीभाषिक शाळा होती. तेव्हापासून आजतागायत पहिली ते सातवी शिक्षण या शाळेतर्फे देण्यात येते. या शाळेचा परिसर झोपडपट्टीचा आहे. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय मजूर, कामगारांची मुले या शाळेत शिकतात. या शाळेचा सध्याचा पट १३५ मुलांचा आहे. आठवड्याभरापूर्वी शाळेच्या सहशिक्षिका शाळेची पाहणी करण्यासाठी आले असता शाळेत चोरी झाल्याचे समोर आले.
त्यानंतर शाळेच्या संस्थेला माहिती दिल्यानंतर मंगळवारी शाळेचे सह शिक्षक राजेश पांडे यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात शाळेत चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी झालेल्या मुद्देमालात शाळेची पितळेची घंटा, नऊ पंखे, पाण्याची मोटर, पाण्याचे मीटर, दिवे, गणित आणि विज्ञानाचे प्रयोग पेटी पेट असा एकूण आठ हजाराच्या मुद्देमालाचा समावेश आहे. पहिल्या दिवशी घंटा नसल्याने शाळा भरल्याचा आणि सुटल्याची सुचना तोंडी द्यावी लागली. त्यामुळे एवढ्या वर्षात काहीतरी चुकल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया येथील शिक्षक राजेश पांडे यांनी दिली.