लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ मधील १७ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना उद्या म्हणजे शनिवारी ‘वन क्लिक’ प्रणालीद्वारे पहिला हप्ता थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच हे सर्व मंजूर घरकुले लवकरात लवकर पूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील राज्यातील २० लाख लाभार्थींना मंजूरी पत्राचे आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम शनिवारी पुण्यातील बालेवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमात वन क्लिक प्रणालीद्वारे पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १७ हजार ९७५ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली. तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी जिल्ह्यातील ५०० लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक २ साठी ठाणे जिल्ह्याला १८ हजार २४८ उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यामध्ये अंबरनाथ ९१६, भिवंडी ४ हजार ५२१, कल्याण १ हजार ९६, मुरबाड ५ हजार ८७३ आणि शहापूर ५ हजार ८४२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी १७ हजार ९७५ घरकुल पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घराचे मंजूरी पत्र आणि पहिला हप्ता मिळणा आहे. तर, उर्वरित २७३ लाभार्थ्यांच्या बँक खात्याची प्रक्रिया चालू असून त्यांनाही लवकरात लवकर पहिला हप्ता आणि मंजुरी पत्र मिळेल असे जिल्हा परिषदेमार्फत सांगण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिला हप्ता १५ हजार, दुसरा हप्ता-७० हजार, तिसरा हप्ता- ३० हजार आणि चोथा हप्ता-५ हजार तसेच शौचालयाकरिता स्वच्छ भारत मिशनमधील बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थीला १२ हजार देय आहे. तर, नरेगा अंतर्गत ९० दिवसाच्या मजूरीकरिता प्रतिदिन २९७ रुपये प्रमाणे २६ हजार ७३० मजूरीच्या स्वरुपात दिली जाते. असे एकुण घरकुल बांधकामासाठी१ लाख ५८ हजार ७३० अनुदान दिले जाते.

तालुका निहाय लाभार्थ्यांची संख्या

तालुका लाभार्थ्यांची संख्या
अंबरनाथ९१५
भिवंडी ४४०८
कल्याण १०८७
शहापूर ५७६४
मुरबाड ५८०१
एकूण १७, ९७५
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beneficiaries of pradhan mantri awas yojana will get first installment on one click mrj