कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरीला लागून मागील अनेक वर्षाच्या काळात विविध कारणांमुळे पदोन्नत्ती न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या योजनेनुसार पदोन्नत्तीचे शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नत्तीची वरिष्ठ वेतनश्रेणी लागू केली जाणार आहे. मे अखेरपर्यंत ही वेतनश्रेणी लागू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
मागील अनेक वर्ष पालिका कर्मचाऱ्यांचे पदोन्नत्ती, अनुकंपा, वारसा हक्क, वरिष्ठ वेतनश्रेणीचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनेचे पदाधिकारी अध्यक्ष बाळ हरदास, उपाध्यक्ष सुरेश तेलवणे, सरचिटणीस सचिन बासरे, तात्या माने, अजय पवार, सुनील पवार प्रयत्नशील आहेत. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाला दिल्या आहेत.
आणखी वाचा-ठाणे : प्रत्येक महिन्यात १९ ते २० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू
आश्वासित प्रगती योजना
पदोन्नत्तीपासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांची पदोन्नत्तीची कुंठीतावस्था घालविण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी १२, २४ वर्षानंतर कर्मचाऱ्याला पदोन्नत्ती नाही मिळाली तरी त्याला त्या पदोन्नत्तीची वेतनश्रेणी लागू केली जात होती. शासनाने आता १० वर्ष, २० वर्ष आणि २० वर्षाचा नियम केला आहे. नोकरीला लागल्यानंतर कर्मचाऱ्याला १० वर्ष, २० वर्ष, ३० वर्षात पदोन्नत्तीची वेतनश्रेणी लागू होणार आहे.
या रचनेप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशाप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त वंदना गुळवे, साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांनी पालिकेतील विविध संवर्गातील तीन हजार ६३६ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ (वरिष्ठ वेतनश्रेणी) देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या पात्रतेसाठी कर्मचाऱ्याने पदोन्नतीच्या वेतनश्रेणीसाठीचे शैक्षणिक पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. पदोन्नत्तीच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असल्याने पदोन्नत्ती नाही ही कर्मचाऱ्यांची कुरकुर कमी होणार आहे.
आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात उत्पन्न दाखले मिळेना, कारवाईच्या भितीमुळे तलाठींनी दाखले काम केले बंद
काही कर्मचारी संघटना मात्र शैक्षणिक पात्रता निकष न पाहता सरसकट आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना द्या, या मागणीसाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे पात्र कर्मचाऱ्यावर अन्याय व चुकीचा पायंडा पडेल, असे काही अधिकाऱ्यांचे मत आहे.
अनेक वर्ष पालिका सेवेत असलेल्या ३६३६ कर्मचाऱ्यांची कुंठीतावस्था घालविण्यासाठी त्यांना पदोन्नत्तीची वेतनश्रेणी देण्याचा प्रस्ताव प्रशासनोन तयार केला आहे. कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता तपासून, आयुक्तांच्या मंजुरीनंतर या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. -हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त.
आश्वासित प्रगती योजना लागू करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता तपासून या योजनेचा लाभ पात्र कर्मचाऱ्यांना लवकरच मिळेल. -सुरेश तेलवणे, उपाध्यक्ष, म्युनसिपल कर्मचारी कामगार सेना