या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आवड आणि निवड वेगवेगळी असली तरी लहानथोर बहुतेक सारेच कलाप्रिय असतात. अनेक जण आपल्या व्यस्त दिनचर्येतून एखादी कला जोपासण्याचा प्रयत्न करतात. त्यातून निखळ आनंद मिळविणे हाच त्यांचा उद्देश असतो. तीन वर्षांपूर्वी ठाण्यात काही समविचारी, कलाप्रेमी महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘फॉरएव्हर यंग’ या संस्थेनेही कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न विविध उपक्रमांद्वारे केला. येत्या रविवारी ३ जुलै रोजी ही संस्था डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात तिसरा वर्धापन दिन साजरा करीत आहे. त्यानिमित्त…

जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन, हा वाद न संपणारा आहे. मात्र धावपळ आणि स्पर्धेच्या युगात अपरिहार्य ठरलेल्या ताणतणावांना आपल्यापासून दूर ठेवायचे असेल तर कोणत्या तरी कलेत मन रमवायला हवे, याबाबतीत आता साऱ्या मानसोपचारतज्ज्ञांचे एकमत आहे. कलेतून मिळणारा निखळ आनंद आपल्याला जगण्याची ऊर्जा मिळवून देत असतो. कलेचे हे माहात्म्य ठाऊक असणाऱ्या ठाण्यातील साधारण चाळिशीतल्या काही महिलांनी एकत्र येत २०१३ मध्ये ‘फॉरएव्हर यंग’ नावाची संस्था स्थापन केली.

या संस्थेमध्ये साधारण चाळीस ते पन्नास या वयोगटातील ४२ महिला आहेत. रुपाली वाळूजकर-देशपांडे यांनी या संस्थेची स्थापना केली. त्यांना स्वत:ला कलेची खूप आवड. मात्र शालेय-महाविद्यालयीन जीवनात त्यांना कलेचे पूर्ण प्रशिक्षण घेता आले नाही.

त्यामुळे लग्नानंतर त्यांनी डॉ. मंजिरी देव यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्या आता कथ्थक विशारद आहेत. एखाददुसरे वर्ष वाया गेले तर त्याबद्दल वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नसते. आपण कधीही शिक्षणाचा श्रीगणेशा करू शकतो.

स्वत:च्या उदाहरणाने त्यांनी हे सिद्ध करून दाखविले होते. आपल्या अवतीभोवतीच्या परिचित महिलांशी त्यांनी याविषयी संवाद साधला. तेव्हा अशा प्रकारे कलेच्या माध्यमातून आनंद घेण्यासाठी एखादी संस्था स्थापन करावी, असे विचार त्यांच्या मनात आले. ‘फॉरएव्हर यंग’ या संस्थेतील महिला नावाच्या आधी ‘आनंदी’ हा शब्द वापरतात. त्यामुळे सकारात्मक विचार बळावतो, असा त्यांना विश्वास आहे.

या महिला विविध ठिकाणी नृत्याच्या माध्यमातून पर्यावरणासारख्या अनेक विषयांवर प्रबोधन करतात. पृथ्वी, जल, तेज, आप, वायू या पंचमहाभुतांनी आपले जीवन समृद्ध केले आहे. त्यामुळेच अग्निमंत्र, वायुमंत्र, आकाशमंडल या विषयांवरील कथ्थक नृत्यरचना त्या सादर करतात. कालियाने यमुनेचे पाणी विषारी केले, ते शुद्ध करण्यासाठी कृष्णाने पुढाकार घेतला. मात्र कलियुगात आपण प्रदूषण केले आहे. त्यामुळे आपणच कृष्ण होऊन या प्रदूषणाचा नायनाट करणे आवश्यक असल्याचा संदेशही त्यांनी नृत्याच्या माध्यमातून दिला आहे. ‘आज समय की मांग यही है – पर्यावरण बचाओ’ असा नाराही त्यांनी तयार केला आहे. ‘स्त्रियांवर होणारे वाढते बलात्कार’ या संवेदनशील विषयावरही नृत्यनाटिकेच्या माध्यमातून या महिलांनी परखड भाष्य केले आहे. समाजातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठीही या महिला संस्थेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत.

संस्थेतील सर्व महिला उच्चशिक्षित असून डॉक्टर, वकील, सी.ए. झालेल्या आहेत. किटी पार्टीमध्ये वेळ घालविण्यापेक्षा कलेला वाव द्या आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने त्यात सहभागी व्हा म्हणजे मनावरचा ताणही हलका होईल, असा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. नृत्याचा सराव त्या घोडबंदर ते वसंतविहार या परिसरात जिथे जागा उपलब्ध होईल, तेथे करतात. या सर्व महिलांनी अनेक वृद्धाश्रमांतील ज्येष्ठ नागरिक आणि अनाथाश्रमातील बालकांसमोर आपली कला सादर केली. त्यामुळे त्यांना त्यांच्या दु:खातून बाहेर पडण्यास मदत केली आहे. ‘जिद्द’ या विशेष मुलांच्या शाळेत तसेच ‘क्षमता’ आणि ‘उडान’ या गरीब महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांमधील महिलांनाही त्या नृत्याचे धडे देत आहेत. सध्या या महिलांचा कथ्थक नृत्याचा सराव सुरू असून ३ जुलै रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात विशेष मुलांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तर ऑगस्ट महिन्यात ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘स्किन अ‍ॅन्ड बर्न’ या विषयावर ते नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.