डोंबिवली जवळील ठाकुर्ली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत एकूण १२५ जणांचा रेल्वे मार्गात पडून, लोकल, मेल-एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. प्रवाशांनी रेल्वे मार्गातून येजा करू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुने १५ फूट उंचीच्या संरक्षित जाळ्या बसविल्या आहेत. तरीही प्रवासी रेल्वे मार्गाचा वापर करत असल्याने रेल्वे अधिकारी हैराण आहेत.
हेही वाचा – डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील काटई चौकातील कोंडी सोडविण्यासाठी रस्ते कामाला सुरुवात
कोपर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुला जिना, विस्तारीकरणाची कामे होणार असल्याने या रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुकडे १५ फूट उंचीचे संरक्षित कठडे बसविण्याची कामे प्रशासनाने हाती घेतली नाहीत. त्यामुळे कोपर पूर्व, आयरे, म्हात्रे नगर भागातील बहुतांशी प्रवासी रेल्वे मार्गातून कोपर रेल्वे स्थानकात येतात. याशिवाय परिसरातील आगासन, म्हातर्डेश्वर परिसरातील रहिवासी रेल्वे मार्गातून दिवसा, रात्री येजा करतात. अनेक वेळा रेल्वे मार्गातून चालत असताना समोरुन येणारी मेल, लोकल कोणत्या रेल्वे मार्गिकेतून येते हे पादचाऱ्याला कळत नाही. तो गोंधळून जातो आणि या गडबडीत अपघात होतो, असे रेल्वे सुत्राने सांगितले.रेल्वे मार्गातून बेकायदा येजा करणाऱ्या प्रवाशांना पोलीस ठाण्यात आणून रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस समजत देतात. परंतु प्रवासी ऐकत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – भिवंडी कोन येथील सरकारी वकिलाच्या मृत्यूला जबाबदार टेम्पो चालकाला सरवली एमआयडीसीतून अटक
कामावर जाण्याची धडपड
मुंबईत कामावर वेळेत गेले पाहिजे म्हणून प्रत्येक नोकरदाराची सकाळच्या वेळेत धडपड असते. सकाळी आठ ते नऊ च्या दरम्यान ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानकातून अति जलद, जलद लोकल पकडली की मुंबईत वेळेत कार्यालयीन वेळेत पोहचता येते. त्यामुळे या तिन्ही रेल्वे स्थानकातील प्रवासी सकाळच्या वेळेत आठ ते नऊ वाजताच्या दरम्यानच्या मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकल मधून प्रवास करण्यासाठी धडपड करतात. प्रत्येक प्रवाशाच्या चढाओढीने सकाळच्या वेळेत मुंबई दिशेने जाणाऱ्या लोकलला तुडुंब गर्दी असली तरी अनेक प्रवासी दरवाजाला लोंबकळत प्रवास करतात. लोंबकळत असताना लोकलने वेग घेतला की एका हाताने तोल सांभाळणे प्रवाशाला कठीण जाते. अशावेळी तोल सांभाळण्याच्या प्रयत्नात असताना लोंबकळणाऱ्या प्रवाशावर आतील प्रवाशांचा भार वाढून प्रवासी रेल्वे मार्गात कोसळतो. काही वेळा रेल्वे मार्गा लगतच्या खांबाचा फटका प्रवाशाला बसून अंधातरी प्रवास करत असलेल्या प्रवासी खाली पडतो. ही अपघाताची खरी कारणे आहेत, असे सुत्राने सांगितले.
लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करू नका, असे रेल्वे प्रशासनातर्फे नियमित आवाहन केले जाते तरी प्रवासी त्यास दाद देत नसल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घटना घडतात, असे रेल्वे अधिकारी म्हणाला. प्रवाशांच्या जागृततेसाठी प्रवासी सुरक्षिता पंधरवडा राबविला जातो. रेल्वे प्रवासाची माहिती, प्रवाशांची जागृतता, रेल्वेने प्रवास करताना कोणत्या कारणाने अपघात होऊ शकतात याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना दिली जाते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
डोंबिवली अपघात
जानेवारी १६, फेब्रुवारी १८, मार्च २१, एप्रिल १८, मे १२, जून १८, जुलै १८ आणि ऑगस्ट १२.