‘भाग्यश्री’, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व)

डोंबिवली हे मध्यमवर्गीयांची बहुसंख्या असलेले शहर आहे. मुंबई परिसरात नोकरी करणाऱ्या शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी नोकरदारांनी सामूहिक सोसायटय़ा करून येथे गृहसंकुले उभारली आहेत. त्यातलेच एक म्हणजे टिळकनगरमधील भाग्यश्री हे संकुल. स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांनी ही वसाहत स्थापन केली.

डोंबिवली शहरात पूर्वेकडे रेल्वे स्थानकापासून चालत पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर टिळकनगर येथे ४५ वर्षांपूर्वी भाग्यश्री हे संकुल उभे राहिले. आता २० ते २५ वर्षांत इमारती खिळखिळ्या झालेल्या दिसतात. भाग्यश्री मात्र साडेचार दशकानंतरही ताठ मानेने उभी आहे. आपल्या मालकीचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र तुटपुंज्या उत्पन्नामुळे अनेकांचे ते स्वप्न अधुरे राहते. स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांना बँकेने घर उभारण्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये बिनव्याजी कर्ज मंजूर केले होते. २५ हजार आता किरकोळ रक्कम वाटत असली तरी १९७२ मध्ये निश्चितच ही रक्कम मोठी होती. त्या योजनेचा लाभ घेऊन कर्मचाऱ्यांनी एकत्र येत डोंबिवलीत संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. त्या काळात कर्मचाऱ्यांचे वेतनही जेमतेम होते. साधारणपणे पाचशे ते हजार रुपये इतकाच पगार हातात पडत होता. त्यामुळे जागा विकत घेणे, इमारत बांधणे इतका खर्च प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या कर्जाने भागणार नव्हता. त्यामुळे १६ कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये रक्कम जमवली. त्यातून मग इमारत उभारणीचे गणित जमले. १९ महिन्यात हे गृहसंकुल उभे राहिले. डोंबिवली, उल्हासनगर, कल्याण आदी भागातील बँकेच्या शाखेतील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. आता अर्थातच ते सर्व कर्मचारी निवृत्त झाले आहेत.

प्रशस्त आणि सशक्त रचना

तळ अधिक तीन मजल्यांच्या इमारतीत प्रत्येकी ५४० चौरस फुटांच्या सदनिका आहेत. प्रत्येक मजल्यावर लांबलचक गॅलरी असल्यामुळे तिथे मुलांना मनसोक्त खेळता येते. मोठय़ांना बसून गप्पा मारता येतात. कुटुंबात पाहुणे मंडळी मोठय़ा प्रमाणात आली तर त्यांना झोपण्यासाठी वा एखादा कार्यक्रम असेल तर पाहुणे मंडळींना ही जागा खूपच सोयीस्कर पडते. गच्चीवरही प्रशस्त मोकळी जागा आहे. तिथे कार्यक्रमांचा धडाका असतो. रहिवाशांना वयोमानामुळे गच्चीवर चढून जाणे आता कठीण जात असल्यामुळे तळमजल्यावरील जागेत कार्यक्रम होतात.

सर्वच बाबतीत तत्परता

अनेकदा मासिक दुरुस्तीसाठी लागणाऱ्या रकमेवरून सोसायटीमध्ये वाद होत असतात. सुदैवाने ‘भाग्यश्री’तील रहिवासी सर्व मराठी आहेत. इथे तसा कोणताही वाद नाही. मुळातच दुरुस्ती खर्च हा कमीच आहे. त्यातच ईसीएस यंत्रणेमार्फत हा देय खर्च जोडला गेला आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला दिलेल्या तारखेला ती रक्कम सोसायटीच्या खात्यात आपोआप जमा होते. होळी, कोजागिरी पौर्णिमा आदी सण मोठय़ा उत्साहात साजरे होतात. यावेळी भोजन व्यवस्था केली जाते. गणेश उत्सव घरोघरी असल्याने तो सार्वजनिक स्वरूपात साजरा होत नाही. वर्षभरातील हळदी-कुंकू, दिवाळी, गुढीपाडवा आदी सण, उत्सव परंपरेप्रमाणे साजरे होत असतात. त्यासाठी लागणारा निधी स्वतंत्ररीत्या रहिवासी देत असतात.

वसाहत गजबजलेल्या ठिकाणी असल्याने सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही यंत्रणेची इथे तशी आवश्यकता नाही. सभोवताली संरक्षक भिंत असल्याने सुरक्षा अबाधित आहे. वसाहतीचे प्रवेशद्वार रात्रीच्या वेळी हे रहिवासीच बंद करत असतात. प्रत्येकाने हे काम वाटून घेतले आहे.

आवारात वाहनतळाची पुरेशी सुविधा असून छोटेसे उद्यानही मोकळा श्वास घेण्यास मदत करते. फणस, आंबा, नारळ, चिंच आदी भली मोठी झाडे वसाहत उभारण्यापूर्वीपासूनच आहेत. त्यामुळे सोसायटीच्या आवारात छान घनगर्द सावली आहे. या झाडांच्या पालापाचोळ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती अविनाश मुजुमदार यांनी दिली.

रस्ता रुंदीकरणात जागा गेली

रस्ता रुंदीकरणात वसाहतीची सुमारे १५० फुटांची जागा गेली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता पालिकेने कारवाई केली. त्याबदल्यात अन्य कोणतीही सुविधा दिली नाही, अशी खंत रहिवासी व्यक्त करतात.

समस्येतून सुविधांकडे

टिळकनगर आता डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात असले, तरी ५० वर्षांपूर्वी हा परिसर निर्जन होता. रात्रीच्या वेळेत रेल्वे स्थानकापासून घरापर्यंत एकटय़ा दुकटय़ाने येणे धोकादायक होते. रात्रीच्या वेळी स्थानकाजवळ कुणाच्या घरी किंवा स्थानकावरच राहत जा. येण्याचे धाडस दाखवू नको अशी ताकीद त्यावेळी वडीलधारी मंडळी द्यायची. पुढे पाथर्ली गावात दहशतीचे वातावरण होते. तेथे जाण्याची कुणाचीच हिंमत होत नसे. १९७५ मध्ये रेल्वेचा ४२ दिवस संप होता. त्यावेळी अक्षरश: आम्ही ट्रकमधून बँकेत कामाला जायचो, असे रोमांचकारी अनुभव सोसायटीचे सचिव अविनाश मुजुमदार सांगतात.

सागर नरेकर suhas.dhuri@expressindia.com

Story img Loader