डोंबिवली : मराठमोळं भजन, त्याचे प्रकार, त्याची महती देशासह विदेशात पोहचविण्यात महत्वाची कामगिरी करणाऱ्या भजन भूषण, ज्येष्ठ भजन सम्राट नलिनी जोशी यांचे गुरुवारी येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, बहिण ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर असा परिवार आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन त्यांनी सर्व भजनी मंडळांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. अभंग, वासुदेव, जोगवा, भारूड, रास गरबा, टिपऱ्या अशा प्रकारांमधून भजन कसे गायायचे याची माहिती भजनी मंडळांना दिली. महिलांनी भजन प्रकारात आघाडीवर असावे म्हणून नलिनी जोशी यांनी रागिणी भजनी मंडळाची स्थापना केली. राज्यासह लंडन मध्ये त्यांनी मराठी भजने सादर केली. भजन संस्कृतीचा प्रचार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना अनेक संस्थांकडून सन्मानित करण्यात आले होते. भजन भूषण हा सन्मान त्यांना प्राप्त झाला होता.