ठाणे : दिवा येथील कचराभूमी बंद करण्यासाठी ठाणे महापालिकेने डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम सुरु असून तोपर्यंत पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प प्रशासनाने उभारला आहे. दिड महिन्यांपुर्वीच सुरु झालेला हा प्रकल्प गेल्या सात दिवसांपासून बंद पडला आहे. या प्रकल्पातील यंत्रणेमध्ये साडी, गाद्या, फर्निचरचा कचरा अडकला असून यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचे पाणीही प्रकल्पात शिरले असून त्याचाही फटका या प्रकल्पाला बसला आहे. यामुळे ठाण्याचा कचरा पुन्हा दिवा कचराभुमीवर टाकला जात आहे. दरम्यान, २ ऑक्टोबरपर्यंत भंडार्ली येथील कचरा विल्हेटवाट प्रकल्पातील बंद पडलेली यंत्रणा सुरु होण्याबरोबरच दिवा आणि मुंब्य्रातील कचरा गोळा करण्यासाठी यंत्रणा उभारणीचे काम पुर्ण होणार आहे. त्यानंतर दिवा कचराभुमी कायमस्वरुपी बंद होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर
हेही वाचा : कल्याण शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ९०० मेट्रीक टन कचरा तयार होतो. महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नसल्यामुळे दिवा येथे कचरा टाकण्यात येत होता. या कचराभुमीला आग लागून धूर परिसरात धुर पसरतो. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते. यामुळे दिवेकरांकडून ही कचराभुमी बंद करण्याची मागणी होत होती. अनेक आंदोलनेही झाली होती. त्यानंतर येथील कचराभूमी बंद करण्यासाठी ठाणे महापालिकेने डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. या प्रकल्पात घनकचऱ्यापासून १३ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. हा ठाणे महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत प्रशासनाने महापालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प उभारला आहे. दिड महिन्यांपुर्वी या प्रकल्पाचे काम पुर्ण करून तो कार्यन्वित करण्यात आला. त्यात ठाणे शहरात निर्माण होणाऱ्या ६०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असल्याचा दावा करत उर्वरीत दिवा आणि मुंब्रा भागातील ३०० मेट्रीक टन कचरा हा दिवा कचराभुमीवर टाकला जात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. भंडार्ली प्रकल्पाच्या ठिकाणी रस्ता अरुंद असल्यामुळे १० चाकी मोठे डम्पर जाऊ शकत नाहीत. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करणे तसेच इतर सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील कचरा आजही दिवा कचराभुमीवर टाकला जात आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पातील यंत्रणेमध्ये साडी, गाद्या, फर्निचरचा कचरा अडकला असून यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचे पाणीही प्रकल्पात शिरले असून त्याचाही फटका या प्रकल्पाला बसला आहे. यामुळे ७ सप्टेंबर पासून हा प्रकल्प बंद आहे. त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे शहरातील कचरा पुन्हा दिवा कचराभुमीवर टाकला जात आहे.
भंडार्लीचा कचरा प्रकल्पातील यंत्रणेत साडी, गाद्या, फर्निचरचा कचरा अडकल्यामुळे हा प्रकल्प सात दिवसांपासून बंद असल्याच्या वृत्तास महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांनी दुजोरा दिला आहे. तसेच मुंब्य्रातील कचरा आता एमएम व्हॅली येथील पालिकेच्या आरक्षित भुखंडावर तर दिव्यातील कचरा डावले येथील शासकीय भुखंडावर टाकला जाणार असून त्यानंतर त्याचे वर्गीकरण करून तो पुढे भंडार्ली येथील प्रकल्पात पाठविला जाणार आहे. येत्या २८ सप्टेंबर र्पयत हे दोन्ही तात्पुरत्या स्वरुपातील प्रकल्प सुरु होणार आहेत. तसेच २ ऑक्टोबरपर्यंत भंडार्ली येथील कचरा विल्हेटवाट प्रकल्पातील बंद पडलेली यंत्रणा सुरु होईल आणि त्यामुळे दिवा कचराभुमी कायमस्वरुपी बंद होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.