डोंबिवली– अपंगांना स्वसामर्थ्याने जगण्यासाठी बळ देणारी, अपंगांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांना हस्तकला, लघु, बैठे व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण देऊन जगण्याची उभारी देणाऱ्या डोंबिवलीतील भरारी अस्थिव्यंग विकलांग संस्थेने आपल्या स्थापनेची २६ वर्ष नुकतीच पूर्ण केली. अपंगालय हे अपंगांच्या पुनर्वसन आणि वास्तव्याचे केंद्र व्हावे म्हणून भरारी संस्थेने डोंबिवली जवळील चिरड गाव हद्दीत ५० रुग्ण शय्येचे अपंगालय उभारण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भरारी अस्थिव्यंग विकलांग संस्थेच्या अध्यक्षा अमिता कोकाटे यांनी दिली.
हेही वाचा >>> ठाण्यात बेकायदा केबलचे जाळे कायमच; इंटरनेट तसेच इतर वाहिन्यां काढण्याची पालिकेची कारवाई थंडावली
अंबरनाथ तालुक्यातील तळोजा रस्त्यावरील चिरड गाव हद्दीत उभारण्यात येणाऱ्या अपंगालय वास्तुचे भूमिपूजन तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते पार पडले. २२ गुंठे क्षेत्रफळावर तीन माळ्याचे अपंगालय उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या वास्तु उभारणीसाठी आवश्यक निधी उभारणीचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाले की प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे अध्यक्षा कोकाटे यांनी सांगितले.
अपंगांना स्वताच्या हिमतीने, आत्मविश्वासाने जगता, फिरता, राहता आले पाहिजे या विचारातून डिसेंबर १९९६ मध्ये डोंबिवलीतील ज्येष्ठ विजय उर्फ भाऊ प्रधान, डाॅ. अजंली आपटे यांच्या संकल्पनेतून भरारी अस्थिव्यंग संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरूवातीला डोंबिवली परिसरातील १२ अपंग सोबतीला होते. अपंग आहोत म्हणून केवळ बैठका, विरंगुळ्यात वेळ न घालविता भाऊ प्रधान, डाॅ. आपटे यांनी आपले दुसऱ्यावरील अवलंबित्व कमी झाले पाहिजे. आपण स्वसामथ्याने प्रत्येक गोष्ट धडधाकट माणसा सारखी केली पाहिजे. या निर्धाराने भाऊंनी अपंगालय चालविले. समविचारी डोंबिवली परिसरातील १२ अपंग नियमित एकमेकांना भेटू लागले. मनोरंजन, सहली, एकमेकांमधील कौशल्य ओळखून त्याप्रमाणे वाटचाल सुरू केली. अपंग हा एक धडधाकट माणूसच आहे हे दाखविण्यासाठी अपंग असुनही भाऊ प्रधान यांनी डोंबिवली ते दिल्ली अंतर तीन चाकी अपंगांच्या सायकलवरुन पार पाडले, असे कोकाटे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> ठाणे: वन्यजीवांची तस्करी करणारे अटकेत; पाच जंगली पोपट, १६ कासव जप्त
सामाजिक कार्य
अपंगांविषयीच्या शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ अपंगांना मिळाला पाहिजे. अपंगांना अपंगात्वाचे दाखले मुंबई, ठाण्यात येरझऱ्या न मारता मिळाले पाहिजेत म्हणून भाऊ प्रधान यांनी डोंबिवलीत अपंग दाखले देण्यासाठी शिबीरे आयोजित केली. हे दाखले यापूर्वी मुंबईतील हाजीअली भागातील शासन संस्थेकडून मिळत असत. अपंगांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना नोकरी, व्यवसाय, बैठ्या जागी काम मिळेल असे उद्योग, व्यवसाय प्रशिक्षण उपक्रम भरारी संस्थेच्या माध्यमातून राबिवण्यात येऊ लागले. डोंबिवली, ठाणे, कल्याण परिसरातील अपंगांना या सेवांचा लाभ देण्यात येऊ लागला. अनेक सामाजिक संस्था, दात्यांकडून भरारी संस्थेला साहाय्य केले जाते. त्यामधून संस्थेचा गाडा सुरू आहे. अपंग हा अपंगाच्या कोशातून बाहेर येऊन सामान्य माणसा सारखा जगला पाहिजे, या ध्येय वाक्यातून भाऊ प्रधान, डॉ. अंजली आपटे यांनी अपंगालयातील उपचारी अपंगांना प्रशिक्षित केले.
वेळोवेळी समुपदेशन कार्यक्रम घेऊन अपंगांच्या मनातील नैराश्य दूर केले. भरारी संस्थेतील हा उभारी घेऊन बाहेर पडलेला, तेथे वास्तव्य करत असलेला प्रत्येक अपंग हा आपल्या अंगभूत कौशल्याचा वापर करुन विणकाम, कपडे शिवणे, पाठांतर, अभिनय अशा क्षेत्रात आपल्या कला दाखवत एकमेकांना साथ देत वाटचाल करत आहे, असे संस्थापक अध्यक्षा डाॅ. आपटे यांनी सांगितले.
चिरड येथे अपंगालय
मागील २६ वर्ष भरारी संस्थेचे अपंगालय दात्यांनी दिलेल्या भाड्याच्या जागेतून सुरू आहे. डोंबिवली जवळील मानपाडा-उंबार्ली रस्त्यावरील साईधारा संकुलात १५ अपंगांच्या शय्येतून अपंगालयाचा प्रवास सुरू आहे. स्वताची वास्तू असावी म्हणून तळोजा रस्त्यावरील चिरड गाव हद्दीत भरारी संस्थेची स्वताची वास्तू उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे. ५० अपंगांच्या शय्येचे येथे नियोजन आहे. दैनंदिन शुश्रूषा केंद्र, समुपदेशन, फिजिओथेरेपी, संगीत कक्ष, प्रेक्षागृह, मनोरंजन विभाग, वाचनालय, पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम येथे राबविले जाणार आहेत. या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक नागरिकांनी सहभाग देण्याचे आवाहन भरारी संस्थेतर्फे करण्यात आले आहे. संपर्क, डाॅ. आपटे, ९८९२०७२७८८.
संस्थेच्या यशस्वीतेसाठी अमिता कोकाटे, अशोक गोरी, प्रतिभा भावे, रेखा कशेळकर, डाॅ. गिरीश खांडगे, सुषमा मांद्रेकर, डाॅ. अंजली आपटे या कार्यकारी मंडळा बरोबर अजित नाडकर्णी, अजित प्रधान, नितीन तेरसे, थत्ते, डाॅ. अरुण पाटील, डाॅ. यशवंत देवधर ही मंडळी प्रयत्नशील आहेत.