ठाणे : मुंबई पाठोपाठ ठाणे शहरात हवा प्रदुषणात वाढ झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने मुंबईहून शहरात येणाऱ्या राडारोड्याच्या गाड्या रोखण्यासाठी मुलूंड चेक नाक्यावर पथक नेमण्याचा तसेच बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ही पथके शहरात गस्त घालून हवेची गुणवत्ता राखण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत असल्याची खात्री करणार आहेत. मार्गदर्शक तत्वाचे पालन करीत नसलेल्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई हवेची गुणवत्ता खालावली आहे. ठाणे शहरातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. या हवेच्या गुणवत्ता पातळीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयाने तीन दिवसांची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पर्यावरण विभाग, वरिष्ठ अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेऊन शहरातील कारवाईबाबतचे निर्देश दिले. शहराच्या बाहेरून ठाण्यात राडारोडा आणून तो रस्त्यांच्या कडेला टाकला जाता. यामुळे धुळप्रदुषणात वाढ होत आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन त्यावर निर्बंध आणण्यासाठी आनंदनगर, मॉडेला चेक नाका येथे पुढील काही दिवस कायमस्वरुपी पथक तैनात करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिले आहेत. रात्रीच्या वेळी राडारोडा टाकण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे सर्व विभागांनी दक्षता घेऊन त्यास पायबंद घालावा अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा >>>डोंबिवली: भागशाळा मैदानावरील फटाक्यांच्या स्टॉलला नागरिकांचा विरोध, पालिका आयुक्तांना सामाजिक कार्यकर्त्याचे पत्र
ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा सातत्याने गाजत असून हवा प्रदुषण वाढीच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनधिकृत बांधकामे पूर्णपणे थांबतील, याची खबरदारी सहाय्यक आयुक्तांनी घ्यावी. अनधिकृत बांधकामांबाबत वेळोवेळी झालेल्या चर्चेनुसार कारवाई करण्यात यावी, याचा पुनरुच्चार आयुक्त बांगर यांनी बैठकीत केला. तसेच प्रभाग समिती क्षेत्रातील अधिकृत बांधकामांनी निर्बंधांचे पालन करावे, यासाठी सगळ्यांनी सर्तक राहवे, अशी सुचनाही त्यांनी दिल्या. फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम, प्रदूषण याबद्दल शालेय विद्यार्थ्यांना जागृत करण्यात यावे. त्यांच्यामार्फत हा संदेश सगळीकडे जावा, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार, महापालिका शिक्षण विभागाने तसेच, खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना फटाक्यांविषयी जागृत करावे, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत. आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. रस्त्यावरची धूळ, बांधकाम स्थळी उडणारा धूरळा, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, बांधकाम साहित्याची वाहतूक याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवावे, त्यासाठी कृती दल तयार करण्यात यावे. स्मशानभूमीवर विद्युत दाहिनी किंवा गॅस शव दाहिनीचा वापर प्राधान्याने होईल यासाठी प्रयत्न करावा. हवेच्या गुणवत्तेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांची आहे, याचे भान ठेवून अतिशय कठोरपणे कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाची अभ्यासिका खासगी संस्थेला देण्याचा घाट?
भरारी पथकांची नेमणूक
हवेची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत असलेले घटक निश्चित करून त्यावर निर्बंध आणण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक लहान मोठ्या बांधकाम ठिकाणांची पथकामार्फत पाहणी करून त्यांच्याकडून मार्गदर्शक तत्वांच्या पालनाची लेखी हमी घेण्याची जबाबदारी शहर विकास विभागांवर देण्यात आली आहे. तर, रस्ते, गटार, फूटपाथ येथील बांधकाम कामांवर, रस्त्यांची दुरुस्ती, धूळमुक्ती याबाबत पाहणी आणि कारवाई करण्याची जबाबदारी शहर अभियंता यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागावर देण्यात आली आहे. तसेच, शहरात किंवा शहराबाहेरून होणारी राडारोड्याची वाहतूक रोखणे, उघड्यावर कोणताही कचरा जाळला जाणार नाही, शेकोट्या पेटवल्या जाणार नाहीत, याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांवर देण्यात आली आहे. पोलीस मुख्यालय, नाशिक रोड, वागळे इस्टेट या भागात राडारोडा रस्त्यांच्या कडेला टाकण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा सर्व ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत. संबंधित सर्व विभाग, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी दैनंदिन कारवाईचा अहवाल पर्यावरण विभागास सादर करावा. त्यात पथकाच्या फेऱ्या, पाहणीची ठिकाणे, आढळलेली निरिक्षणे, करण्यात आलेली कारवाई याचा तपशील समाविष्ट असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हवेची पातळी दर्शवणारी यंत्रणा
ठाणे शहरात महापालिकेची तीन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची दोन अशी पाच प्रदूषण नोंद केंद्रे आहेत. त्याबरोबरीने प्रत्येक दहा ते वीस चौरस मीटर क्षेत्रासाठी एक प्रदूषण नोंद स्वयंचलित यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू करावी, त्याची माहिती लगेचच सोबतच्या इलेक्ट्रॉनिक फलकावर दर्शविण्यात यावी. यामुळे नागरिकांमध्येही त्याबद्दल जागरुकता वाढेल. मुंबई महापालिकेचे हवेची गुणवत्ता राखण्यासाठी विस्तृत धोरण मार्च २०२३ मध्ये तयार केले आहे. ते ठाणे महापालिकेने स्वीकारून तत्काळ लागू करण्यात यावे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करायला हवे आणि काय टाळायचे याची माहिती देणारी पोस्टर्स सर्व गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावीत. मेट्रोच्या बांधकाम ठिकाणी घ्यायच्या काळजीबद्दल मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ अवगत करून त्याचा दैनंदिन पाठपुरावा करावा. तसेच, एमआयडीसीलाही औद्योगिक क्षेत्र आणि कंपन्यांमधील घ्यायच्या काळजीबाबत अवगत करण्यात यावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.