धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदे यांनी आपली दोन मुले गमावल्याचा प्रसंग दाखविला आहे. अतिशय दुःखद आणि दुर्दैवी असा तो प्रसंग आहे. दोन दोन मुलं ज्याला गमवावी लागली, त्याचे दुःख काय असते? हे आम्ही समजू शकतो. कुणासोबतच असा प्रसंग घडू नये. त्या प्रसंगानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुम्हाला सावरलं. तुम्हाला दुःखातून बाहेर काढलं. पण आज बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या मुलाला दुःखात ढकललं. कुठं फेडाल हे पाप? असा सवाल उपस्थित करत भास्कर जाधव यांनी शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यातच जोरदार हल्ला केला.
तुमची मुलं अकाली गेल्यानंतर दिघे साहेबांनी तुम्हाला सावरलं
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात बोलत असताना मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी धर्मवीर चित्रपटाची आठवण करुन दिली. “आपली दोन लहान मुलं गमावल्यानंतर एकनाथ शिंदेंनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते. धर्मवीर आनंद दिघे शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढतात. राजन विचारे यांना दिघेंनी बोलावून घेतलं. दिघे यांनी एकनाथ शिंदेंना दुःखातून बाहेर काढायचे असेल तर त्याला कामात गुंतवण्यासाठी सभागृह नेते पदावर बसवू असे सांगितले. राजन विचारे यांनी क्षणाचाही विचार न करता राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांना सभागृह नेतेपदी बसवले. दिघे साहेबांनी मुलं गमावलेल्या एकनाथ शिंदेंना दुःखातून बाहेर काढलं. पण त्याच एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या मुलाला दुःखात ढकललं”, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
भास्कर जाधव यांचे भाषण ऐका –
भास्कर जाधव म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि माझे वैयक्तिक भांडण नाही. ही लढाई तत्त्वांची आहे. तत्त्वांच्या लढाईत सख्खा भाऊ जरी आला तरी त्याला सोडता कामा नये, असे धर्मशास्त्र सांगतात. आमची तत्त्वांची लढाई आहे.” एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर चित्रपट काढला याची आठवण करुन देताना भास्कर जाधव यांनी त्यांना सम्राट पृथ्वीराज चौहान चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. या चित्रपटात ज्याप्रकारे जयचंद राठोड यांची जशी अवस्था झाली. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचा जयचंद राठोड झाल्याशिवाय राहणार नाही. भाजपा तुमचा जयचंद राठोड करेल, असेही भास्कर जाधव म्हणाले.
सब का विश्वासघात, ही प्रवृत्ती उघड करणार
हे सरकार ‘सब का साथ, सब का विकास’ अशी घोषणा देत असतं. पण आगामी अर्थसंकल्पात यांची ही घोषणा फसवी असल्याचं मी पटवून देणार आहे. फक्त निवडणुकांसाठी सरकारला ‘सब का साथ’ पाहीजे असतो. पण निवडणूक झाल्यानंतर सब का विकास होत नाही. ठराविक लोकांचा विकास होतो आणि ‘सब का विश्वासघात’ केला जातो. ही त्यांची खरी प्रवृत्ती असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी अधिवेशनात आम्ही यांचे खरे रुप बाहेर काढू, असेही आव्हान भास्कर जाधव यांनी दिले.