शहापूर तालुक्यातील घाटमाथ्यावर उगम पावणारी भातसा नदी म्हणजे बारामाही जलस्रोत. वर्षभर दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीमुळे काठावरील गावे नैसर्गिकदृष्टय़ा समृद्ध झाली.. त्यापैकीच एक गाव म्हणजे भातसई! वासिंद रेल्वे स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. नदीच्या कुशीत विसावले असल्याने येथे चोहोबाजूने हिरवाई नांदते आहे. ऐन उन्हाळय़ातही भातसा नदी भरभरून वाहत असल्याने या गावाला भेट देण्यासाठी आणि तेथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची संख्या येथे वाढत आहे.
वासिंद रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला भातसईला जाण्यासाठी गाडय़ा उभ्या असतात. मात्र चालत जाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. वासिंद स्थानकापासून पाच मिनिटांवरच नदीचे पात्र दिसते. या नदीलाच समांतर असलेला रस्ता भातसई गावात जातो. नदीच्या काठावर असलेल्या या रस्त्यावर दुतर्फा वृक्षराई असल्याने चालताना नैसर्गिक थंडावा मिळतो. नदीकाठीला हा परिसर रमणीय असल्याने अनेक फार्म हाऊस या ठिकाणी आहेत. अनेकांनी खासगी पर्यटन केंद्रेही येथे उभारली आहेत. त्यापैकी एक म्हणजे सृष्टी फार्म. भातसईला जाणाऱ्या रस्त्यावरच असलेल्या या निसर्ग पर्यटन केंद्रात बोटिंग, स्विमिंग आणि अन्य खेळांची सोय आहे.
अध्र्या तासात चालत भातसई गावात पोहोचतो, तेव्हा नदीकाठचा निसर्गरम्य देखावा नयनतृप्त करतो. अतिशय नितळ आणि निळेशार पाणी लक्ष वेधून घेते. येथील वातावरणही अतिशय आल्हाददायक. नदीकाठची घनदाट वनराई आणि नीरव शांतता आपल्याला घटकाभर निवांतपणा मिळवून देते. मध्येच पक्ष्यांची किलबिल सुरू होते, पण त्यामुळे शांततेचा भंग होत नाही तर ही किलबिलही हवीहवीशी वाटते. आंब्याची, पिंपळाची, बोराची झाडे नदीकाठी आहेत, त्याबरोबरच विविध झुडपे आणि वेलीही असल्याने नटलेल्या या हिरव्या सौंदर्याचा आपणास आस्वाद घेता येतो.
भातसई गावातील तरुण बिग रेड टेन्ट या कंपनीच्या माध्यमातून पर्यटकांसाठी विविध सेवा पुरवतात. कयाकिंग, नौकाविहार किंवा जंगलात भटकंती अशा प्रकारची सेवा दिली जाते, त्याशिवाय जेवण व नाष्टय़ाचीही सोय केली जाते. अशा निसर्गरम्य वातावरणात साप्ताहिक सुटी साजरी करायला मुंबई-ठाण्यातील अनेक जण पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येथे येतात. भातसई गावावरूनच या नदीला भातसा हे नाव पडले आहे. ऐन उन्हाळय़ातही मुबलक पाणी असल्याने दुथडी भरून वाहणाऱ्या भातसा नदीकिनारी वसलेल्या भातसईला पर्यटक आवर्जून भेट देतात.
सहज सफर : नदीच्या काठावरील रम्य गाव!
शहापूर तालुक्यातील घाटमाथ्यावर उगम पावणारी भातसा नदी म्हणजे बारामाही जलस्रोत.
Written by संदीप नलावडे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-03-2016 at 03:05 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhatsai village in shahapur taluka