नीलेश पानमंद
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला आणि विशेषत: धरणांचा तालुका असलेल्या शहापूर पट्टयाला वर्षांनुवर्षे बसत असलेल्या पाणीटंचाईच्या झळा कमी व्हाव्यात यासाठी मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली भावली धरण पाणी योजनेतील कामे पर्यावरणासह रेल्वे, राष्ट्रीय-राज्य महामार्ग तसेच जलसंपदा विभागाच्या विविध मंजुऱ्यांच्या संथगतीमुळे अक्षरश: रडतखडत सुरू आहे.
शहापूर तालुक्यातील ९७ आदिवासी पाडे आणि २५९ गावांना नाशिकच्या भावली धरणातून पाणीपुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या योजनेतील कामांना सुरुवात करण्यात आली. मात्र पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या भागांमधून जाणारी जलवाहिनी आणि इतर कामांसाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणाच्या विविध मंजुऱ्यांची प्रतीक्षा असल्याने ही कामे बऱ्याच भागात ठप्प आहेत.
गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत या बहुचर्चित प्रकल्पाचे जेमतेम २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७५ टक्के काम एका वर्षांत पूर्ण करण्याचे आव्हान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापुढे असले तरी ही मुदत पाळली जाईल का याविषयी एकूणच संभ्रमाचे वातावरण आहे. या योजनेतील जलवाहिन्या अंथरणे तसेच जलकुंभ उभारणीसाठी जल संपदा, वन, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा प्राधिकरणांकडून अद्याप परवानगी मिळालेली नसल्यामुळे ही योजना लांबणीवर पडण्याची भीती अधिक आहे.
शहापूर तालुक्यातील धरणांमधून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. शहापूर तालुका हा आदिवासी तालुका असून आदिवासी पाडे डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे त्यांना तालुक्यातील धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. दरवर्षी फेब्रुवारीपासूनच गावपाडय़ांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी येथील ९७ आदिवासी गावे आणि २५९ गावांसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेसाठी २८६ कोटी ८५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
परवानगीची प्रतीक्षा
जलवाहिन्या अंथरण्याबरोबरच जलकुंभ उभारणीसाठी जल संपदा, वन, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गावठाण खासगी जमिनी हस्तांतरित कराव्या लागणार आहेत. त्यासाठी संबंधित विभागांकडून परवानगी मिळालेली नाही. जलसंपदा विभागाच्या जागेत ३५ दशलक्षलीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित असून त्यासाठी २.११ हेक्टर जागा आवश्यक आहे. वनविभागाच्या हद्दीत १० जलकुंभ आणि ४२.७३ जलवाहिन्या जाणार आहेत. ९ ठिकाणी रेल्वे रुळाखालून जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. ११ ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाखालून जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. राज्य मार्गाच्या जागेतून५३.३७ किमीची जलवाहिनी तर, बांधकाम विभागाच्या जागेतून १०८.०५ किमीची जलवाहिनी जाणार आहे. शिवाय, ८ ठिकाणी मार्गाखालून जलवाहिनी टाकावी लागणार आहे. ६ ग्रामपंचायतीच्या तर ३१ खासगी जागेत जलकुंभ प्रस्तावित आहेत.
प्रकल्प असा..
शहापूर तालुक्यातील ९७ आदिवासी पाडे आणि २५९ गावांना नाशिकच्या भावली धरणातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेकरिता डीआय तसेच मृद पोलादी प्रकाराच्या १०० मीमी ते ९०० मीमी व्यासाच्या एकूण २५३.६६ किमी लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. २१ बैठे आणि २६ उंच जलकुंभ बांधण्यात येणार आहेत.
कामाची सद्यस्थिती..
मुंबईतील आर ए घुले या कंपनीला योजनेचे काम देण्यात आले आहे. या कंपनीने जलवाहिन्या तसेच इतर विविध साहित्यांचा पुरवठा कामाच्या ठिकाणी केला आहे. ३५.१५ किमी लांबीपर्यंत जलवाहिन्या अंथरण्यात आल्या असून उर्वरित ठिकाणी ही कामे सुरू आहेत. योजनेतील ३९ उंच व भुस्तर जलकुंभाचे संकल्पन व आराखडे मंजूर करण्यात आले आहेत. तसेच १८ जलकुंभाचे खोदकाम पूर्ण झालेले आहे.
योजनेचे काम ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या योजनेतील जलवाहिन्या अंथरण्याबरोबरच जलकुंभ उभारणीसाठी संबंधित प्राधिकरणांकडे पाठपुरावा सुरू आहे.