ठाणे – भिवंडी येथील रेडलाईट एरिया म्हणून प्रचलित असलेल्या हनुमान टेकडी परिसरातून ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि भिवंडी पोलिसांनी कारवाई करून सहा घुसखोर बांगलादेशी महिलांना नुकतीच अटक केली आहे. या महिलांकडून पारपत्र आढळून आलेले नाही तसेच त्या बेकायदेशीररित्या भारतात आल्याचे त्यांनी स्वतः कबुल केले आहे. या घुसखोरीबाबत लोकसत्ता ठाणेमध्ये सातत्याने याबाबत वृत्तांकनही करण्यात आले होते. मात्र पोलिसांच्या संथ कारवाईमुळे बेकायदेशीररित्या वास्तव करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार येथील सामाजिक संस्थांकडून देखील करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील घुसखोर बांगलादेशींचा प्रश्न गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
देहविक्रय करणाऱ्या महिलांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात गेल्या काही वर्षांत बांगलादेशी महिलांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. येथील महिलांना या व्यवसायाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थांनी एक सर्वेक्षण केले होते. याद्वारे भारतात अनधिकृतरीत्या प्रवेश करून या महिलांनी देहविक्रयाचा पर्याय निवडल्याचेही स्पष्ट झाले होते. काही दलाल त्यांना देशात अधिकृतरीत्या राहण्यासाठी मदत करीत असल्याची धक्कादायक माहिती ही यातून उघडकीस आली होती. या व्यवसायातून महिलांना बाहेर काढून त्यांना पर्यायी व्यवसाय किंवा रोजगार देणे. त्यांच्या मुलांचे पुनर्वसन करणे. त्यांच्या शिक्षण आणि रोजगारासाठी सहकार्य करणे अशी विविध कामे सामाजिक संघटना करतात, याच संघटनांकडून येथील महिलांचे सर्वेक्षण करून त्यांची मानसिकता तपासली जाते. सर्वेक्षणात या महिलांची संख्या निम्म्यापेक्षा अधिक असल्याची बाब उघड झाली होती. याबाबत लोकसत्ताने ठाणेने वृत्त प्रकाशित करून ही बाब समोर आणली होती. यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी या ठिकाणी बांगलादेशी महिलांना निवारा देणाऱ्या घरमालकांवर कारवाई करण्यात येईल सांगितले होते. मात्र ही कारवाई केवळ कागदोपत्रीच राहिली आणि या महिलांना आणि त्यांना आसरा देणाऱ्यांना पेव फुटले. मात्र याचे प्रमाण वाढत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. यानुसार भिवंडी पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करून सहा बांगलादेशी महिलांना अटक केली. तर यानंतर या महिलांची चौकशी केली असता त्यांच्याकडून अधिकृत पारपत्र आढळून आले नाही. तसेच या महिलांनी भारतात अनधिकृत पद्धतीने प्रवेश केल्याचे स्वतः कबुल केले आहे. यामुळे हनुमान टेकडी परिसरात बांगलादेशी महिलांचे वास्त्यव्य वाढत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा – मुंबई नाशिक महामार्गावर अपघात, ठाण्यात वाहनांच्या रांगा; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल
वास्तव्य कसे ?
या महिलांना दलालांच्या माध्यमातून भारतात प्रवेश दिला जातो. त्यानंतर स्थानिक दलाल आणि मध्यस्थांच्या माध्यमातून या महिलांना अधिकृतता दिली जाते. त्यांची बनावट ओळखपत्रे तयार केली जातात, त्यांना राहण्यासाठी जागा भाड्याने दिल्या जातात, त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारीही याच दलालांकडे असते. या भागात स्थानिक पोलिसांकडून ज्या ज्या वेळी कारवाई केली जाते त्यात फक्त येथील महिलाच भरडल्या जातात. कारवाईपासून दलालांना झळ पोहोचत नाही.
या महिलांना देहविक्रीच्या व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी काही सामाजिक संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र या सामाजिक संस्थांच्या कामात अडथळा आणण्याचे काम काही समाजकंटकांकडून केले जाते. मात्र या कारवाईनंतर या महिलांना आसरा देणारे आणि बनावट कागपत्र पुरविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मात्र येथील बांगलादेशी घुसखोर महिलांची संख्या अधिक असून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी येथील सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.
हेही वाचा – ५६४ पाणथळींचे भवितव्य नव्या सरकारच्या हाती!
बेकायदेशीररित्या भिवंडीमध्ये वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर पोलिसांचे लक्ष आहे. यापूर्वीही बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली होती. यापुढेही ही कारवाई सुरू राहील. – चेतना चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष