कल्याण – भिवंडी खाडी किनारा भागातील दिवे, खारबाव, केवणी, पिंपळास, कोन परिसरात दिवसा, रात्री पुन्हा वाळू माफियांकडून वाळूचा उपसा करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाल्यावर भिवंडीचे तहसीलदार अभिजीत खोले यांनी कारवाई पथकाला सोबत घेऊन वाळू उपसा करणाऱ्या सर्व बोटी जप्त केल्या. या बोटी खेचकाम यंत्राने खाडी किनारी आणून त्या कापकाम यंत्राने कापून, त्यांचे तुकडे करून त्या पेट्रोल टाकून भस्मसात केल्या.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागाकडून दिवसा वाळू उपसा करताना कारवाई होत असल्याने भिवंडी भागातील दिवे, केवणी, खारबाव, पिंपळास, कोन भागातील वाळू माफिया संध्याकाळी सात वाजल्यानंतर ते पहाटे चार वाजेपर्यंत खाडीत वाळू उपसा करून रात्रीतून वाळूचे वहन करत असल्याच्या तक्रारी भिवंडीचे तहसीलदार खोले यांच्याकडे आल्या होत्या. दिवसा या वाळू उपसा बोटी खारफुटीचे जंगल, खाडी किनारची झाडे यांच्या आडोशाला उभ्या करण्यात येत होत्या. या बोटी दिवसा खाडी किनारी भागात वाळू माफियांकडून उभ्या करण्यात येतात याची पक्की माहिती मिळाल्यावर तहसीलदार खोले यांनी महसूल विभागाचे तोडकाम पथक, कापकाम यंत्र सोबत घेऊन खारबाव, दिवे, केवणी, पिंपळास, कोन खाडी किनारा गाठला. त्यावेळी काही वाळू माफिया खाडीत वाळू उपसा करत होते. ते महसूल विभागाच्या पथकाला पाहताच खाडीत उड्या मारून पळून गेले. वाळू माफियांच्या झाडांच्या, खारफुटी जंंगलाच्या आडोशाने उभ्या केलेल्या वाळू माफियांच्या बोटी खेचकाम यंत्राच्या साहाय्याने खाडी किनारी आणण्यात आल्या. या बोटी कापकाम यंत्राने कापून त्यांचे तुकडे करण्यात आले. त्यानंतर या बोटींना पुन्हा वापरता येणार नाही अशा पध्दतीने पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आल्या. अशाप्रकारे आठ ते नऊ बोटी, सक्शन पंप अधिकाऱ्यांनी जाळून टाकल्या. या कारवाईने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे.

भिवंडी खाडी किनारा भागात दिवसा, रात्री चोरून वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींची खात्री केल्यानंतर वाळू तस्करांच्या बोटी खाडी किनारी आणून त्या तोडून जाळून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वाळू माफियांच्या बोटी, सक्शन पंप नष्ट करण्यात आले. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. – अभिजीत खोले, तहसीलदार, भिवंडी.

Story img Loader