ठाणे : भिवंडी येथे १३ वर्षीय मुलाचा दरड कोसळून मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनास नेण्यासाठी शववाहिनी उपलब्ध नव्हती आणि रुग्णवाहिनी नाकारण्यात आली असा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. मुलाचा मृतदेह एका कारमधून नेण्यात आला. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही श्रमजीवीने केला आहे.

भिवंडी तालुक्यातील उसगाव येथील आदिवासी वाडीतील हर्षद जानू मेढा या तेरा वर्षीय मुलाचा मंगळवारी सकाळी दरड कोसळून मृत्यू झाला. त्याच्यासोबत तीन मुले देखील जखमी झाली. एकूलता मुलगा गेल्याने हर्षदचे आईवडील खचले. त्यांच्या मुलाचे शवविच्छेदन होऊ नये असे त्याना वाटत होते. गणेशपुरी पोलिसांनी पालकांना समजविण्याचा प्रयत्न केला. अखेर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पालकांना कसेबसे समजाविण्यात आले. त्यानंतर ते शवविच्छेदनासाठी तयार झाले.

शववाहिका ग्रामीण भागात नाही

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शववाहिनी उपलब्ध नाही असे श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष प्रमोद पवार प्रमोद पवार यांनी सांगितले. वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सुविधा नसल्याने त्याचा मृतदेह भिवंडी येथील आयजीएम या सरकारी रुग्णालयात नेण्यात येणार होता.

रुग्णवाहिका देण्यास विरोध

उसगाव येथून आयजीएम रुग्णालय २६ किलोमीटर अंतरावर आहे. परंतु या बालकाचा मृतदेह भिवंडी येथे नेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी देण्यास विरोध केल्याचा आरोप श्रमजीवीने केला. अखेर प्रमोद पवार यांनी स्वतःच्या खासगी कारने हा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी येथे नेला.

काय म्हणाले प्रमोद पवार

रुग्णवाहिका मिळावी यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांचे उत्तर आले डॉक्टर काॅल घेत नाही, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक दिला, त्यांना कॉल केला तर म्हणाले माहिती घेतो, पण नंतर कॉल घेतला नाही ही आहे आपली व्यवस्था, असे सांगत पवार यांनी आरोग्य विभागाचा निषेध केला.

दोन रुग्णवाहिका उपलब्ध तरीही..

एका आदिवासी बालकाच्या मृतदेहाला नेण्यासाठी साधी एक शववाहिनी नाही, उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिका नियम आणि अटी दाखवत देण्यास नकार दिला जातो. अखेर स्वतःच्या कारमध्ये कसा बसा मृतदेह टाकत शविच्छेदनासाठी नेला, रस्त्यात भिवंडी शहरातून खासगी शववाहिनी बोलावली, आणि त्यातून पुढील प्रवास केला. सामान आणि औषधाची वाहतूक करताना नियम बाजूला ठेवले जातात. मात्र, गरिबांना मृतदेह नेताना रुग्णवाहिका नाकारली जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे. वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन का होत नाही याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे, आणि रुग्णवाहिका नाकारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी प्रमोद पवार यांनी केली.