इलाहाबाद येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आझाद अन्सारी ऊर्फ एझाझ ऊर्फ नन्हे याने रचलेला भिवंडी येथील नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या हत्येचा कट जॉर्ज टाऊन अलाहाबाद पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी नन्हेच्या तिघा साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून, भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलाहाबाद येथील नैनी जेलमध्ये नन्हे हा जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. नन्हे याने इन्द्रेशकुमार गुलाब सिंह, मो.सलीम ऊर्फ शेख मो. हनीफ, रमेशकुमार रामटहल बिंद यांना शेट्टी यांची हत्या करण्यास सांगितले होते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात भिवंडी येथील शेट्टी यांच्या घरी जाऊन २५ लाखाची खंडणी उकळण्याचा आणि त्यांची हत्या करण्याचा कट आरोपींनी रचला होता. दरम्यान हा गुन्हा करण्याच्या तयारीत असतानाच जॉर्ज टाऊन अलाहाबाद पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे ४० हजार रोख रक्कम व पिस्तुल सापडले. या प्रकरणी शेट्टी यांच्या तक्रारीनंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader