ठाणे : गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू ठरलेल्या भिवंडी शहराची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली आहे. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील संथगती शहरांच्या यादीत भिवंडी पाचव्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. भिवंडी शहरातील गोदामांच्या दिशेने होणारी अवजड वाहतूक, ग्रामीण हद्दीत झालेल्या बेकायदा बांधकामांमुळे वाढलेले नागरिकरण, अरुंद आणि खराब रस्ते, पावसाळ्यात रस्त्यांवर साचणारे पाणी, यामुळे वाहतूक कोंडी होत असून जागतिक पातळीवर घेतलेल्या दखलमुळे शहरातील कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहर हे गोदामांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग, जुना आग्रा रोड हे मुख्य मार्ग जातात. या मार्गांवरून भिवंडीतील गोदामांच्या दिशेने देश तसेच राज्यभरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या शहरात मोठ्या प्रमाणात हात आणि यंत्रमाग कारखाने आहेत. याठिकाणीही वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. याशिवाय, भिवंडी शहराच्या आसपास असलेल्या कशेळी, काल्हेर, पुर्णा या भागांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. यामुळे या भागांचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या वाहनांची वाहतूक मुंबई-नाशिक महामार्ग आणि जुना आग्रा रोड या मार्गेच सुरू असते. ठाणे, नवी मुंबई महापालिकांच्या परिवहन सेवेच्या बसगाड्यांची वाहतूक सुरू असते.
हेही वाचा >>> “कल्याण लोकसभा लढविताना नावापुढं…”, श्रीकांत शिंदेंचा राजू पाटलांना टोला
या भागातील बहुतांश रस्ते अरुंद असून त्यातही अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यापैकी जुना आग्रा रोडवरील कशेळी-काल्हेर भागात सिमेंट काँक्रीटचे रस्ते काही महिन्यांपुर्वी तयार करण्यात आले असून काही भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. यंदाही हे चित्र कायम होते. या खड्ड्यांमुळे मुंबई नाशिक महामार्गावर सात ते आठ किलोमीटर पर्यंत रांगा लागत होत्या. त्यामुळे भिवंडी बायपास ते माजिवडा हे अंतर गाठण्यासाठी वाहन चालकांना तीन ते चार तास लागत होते. या वाहतूक कोंडीची झळ ठाणे आणि कल्याण शहराला देखील बसत असते. अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकारही घडतात. एकूणच अरुंद रस्ते, खड्डे, पाणी तुंबणे या सर्वाचा वाहतूकीवर परिणाम होऊन येथील संथगतीने सुरू असते. त्याचीच नोंद आता जगातिक पातळीवर घेण्यात आली आहे.
‘अमेरिकेतील नॅशनल ब्युरो ऑफ इकोनाॅमिक रिसर्च’ या खासगी संस्थेने १५२ देशातील १ हजार २०० शहरांचे सर्वेक्षण केले. १२ जून ते ५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी संस्थेने गुगल नकाशाचा (मॅप) वापर केला. त्यामध्ये जगातील संथगती शहरांच्या यादीत भिवंडी पाचव्या क्रमांकावर असल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यापाठोपाठ कोलकता शहराचा सहावा, मुंबई शहराचा १३ वा क्रमांक लागत आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भिवंडीतून मुंबई-नाशिक महामार्ग तसेच इतर प्रमुख रस्ते जातात. परंतु येथील काही रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून यामुळे वाहतूक संथ होऊन कोंडी होते. त्याचा त्रास सहन करावा लागत असतो. शहरातील रस्ते रुंद झाल्यास ही परिस्थिती सुधारू शकते. – रणजीत पाटील, प्रवासी.