ठाणे : भिवंडी येथील जिलानी ही अनधिकृत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला असून २५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली शोध घेतल्यानंतर कोणीही व्यक्ती आढळले नसल्याने ८० तासांनंतर शोधकार्य थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
भिवंडी येथील कामतघर भागातील पटेल कंपाउंड परिसरात जिलानी नावाची तीन मजली इमारत होती. सुमारे ४५ वर्षे जुन्या असलेल्या इमारतीत ४० कुटुंबे राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये या इमारतीचा समावेश होता. तसेच ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावली होती. असे असतानाही येथील रहिवाशांनी इमारत रिकामी केली नव्हती. सोमवारी पहाटे इमारतीचा अर्धा भाग कोसळला होता.