कल्याण – भिवंडी लोकसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकांना सुरूवात केली आहे. मुरबाड तालुक्यातील म्हसा रस्ता येथे सोमवारी आयोजित बैठकीला आमदार किसन कथोरे यांच्यासह भाजपचे बूथ प्रमुख, स्थानिक पदाधिकारी यांनी दांडी मारल्याने पाटील-कथोरे यांच्यामधील धुसफूस सुरूच राहणार असल्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील अडीच वर्षापासून केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्यात जोरदार धुसफूस सुरू आहे. गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेऊन आमदार कथोरे यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. भाजप जिल्हा कार्यकारिणीत मंत्री कपील पाटील यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावून आमदार कथोरे समर्थकांची कोंडी केली. आमदार कथोरे यांच्या मुरबाड मतदारसंघात कार्यक्रम घेऊनही त्याला कथोरे यांना डावलण्याचे प्रयत्न पाटील समर्थकांनी केले, असे कथोरे समर्थक सांगतात.

हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध

कथोरे हे कुणबी समजातील असल्याने मंत्री पाटील यांनी वेळोवेळी कुणबी विषयावर भाष्य करून कथोरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराने भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड, शहापूर, भिवंडी ग्रामीण, वाडा तालुक्यातील काही भागातील कुणबी समाज मंत्री पाटील यांच्यावर नाराज आहे.

भिवंडी लोकसभेसाठी आपणही प्रयत्नशील असल्याचे भाष्य केल्यानंतर पाटील यांनी कथोरे यांना लक्ष्य केले होते. हा राग आमदार कथोरे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये ठासून भरला आहे. भिवंडी लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी आमदार कथोरे यांच्या बदलापूर येथील घरी जाऊन त्यांची भेट घेऊन सहकार्य करण्याची मागणी केली असली तरी, आमदार कथोरे त्या मागणीला किती साद देतात हे मुरबाड म्हसा रोड येथील त्यांच्या आणि समर्थकांच्या अनुपस्थितीवरून स्पष्ट झाले आहे.

कथोरेंवर टीका

मुरबाड येथील बैठकीत कपील पाटील यांनी ज्यांना आपली कटकट वाटत होती. ज्यांना आपली उमेदवारी कापली जाईल असे वाटत होते तेच या बैठकीला आले नाहीत. हत्तीणीच्या पिल्लाने आपले उमेदवारीचे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. त्यांची ती जुनीच सवय आहे, अशा शब्दात मंत्री पाटील यांनी आमदार कथोरे यांना टोला लगावला.

आपल्या समोर कोण उमेदवार याची आपणास चिंता नाही. आपण हमखास मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ. आपल्या समोर जातीयवादाची गणितेच नाहीत. आपणास गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार जाती माहिती आहेत. मला आगरी म्हणून मत नको, जातीला मत नको तर विकासाला मत द्या, असे आवाहन मंत्री पाटील यांनी उपस्थितांना केले.

हेही वाचा – जादा परताव्याच्या आमिषाने गुतंवणूकदारांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक, सॅमसन युनिट्रेड कंपनीचा संचालक अटकेत

केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी पाच वर्षांच्या काळात आपल्या मतदारसंघातील आमदारांशी कधी सलोख्याचे संबंध ठेवले नाहीत. जातीचे राजकारण करून ठरावीक मंडळींना पुढे केले. त्यामुळे भिवंडी भागात पाटील यांच्या विषयी नाराजी असल्याचे समजते. अधिक माहितीसाठी आमदार किसन कथोरे यांना संपर्क साधला, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi lok sabha kapil patil bjp kisan kathore supporters turn their backs towards kapil patil meeting in murbad ssb