कल्याण – भिवंडी लोकसभेचे खासदार केंद्रीय मंत्री कपील पाटील यांंनी सोमवारी सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांंचे आभार मानले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघात मनसेची ताकद आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत मनसेने बाळ्या मामाच्या माध्यमातून एका लाखाहून अधिक मते घेतली होती. त्यामुळे भाजपबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेची मतेही पाटील यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड, शहापूर, भिवंडी पूर्व, पश्चिम, ग्रामीण, कल्याण विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने सहकार्य करावे, अशी गळही केंंद्रीय मंत्री पाटील यांनी राज ठाकरे यांना घातल्याचे उपस्थित नेत्यांनी सांगितले.
हेही वाचा – कल्याण : महागड्या मद्याच्या बाटलांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
राज ठाकरे यांनी आपल्या प्रचारासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघात सोयीप्रमाणे प्रचाराची सभा घ्यावी, अशीही चर्चा यावेळी झाल्याचे समजते. राज ठाकरे यांंनी महायुतीला पाठिंंबा दिल्यापासून आता राज ठाकरे यांची प्रतिमा महायुतीच्या प्रचारांच्या फलकांंवर झळकू लागली आहे. राज ठाकरे यांच्या महायुतीच्या पाठिंंब्याबद्दल स्थानिक कार्यकर्ते काही ठिकाणी नाराज आहेत. या नाराजीतून डोंबिवलीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अनेक ठिकाणी ही नाराजी मनसे नेत्यांकडून दूर केली जात आहे. राज ठाकरे यांची भेट म्हणजे केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या विषयी स्थानिक पातळीवर असलेली नाराजी दूर करण्याचा हा मोठा प्रयत्न असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.
हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
या भेटीच्यावेळी राज ठाकरे आणि कपील पाटील यांनी भिवंडी लोकसभा हद्दीतील विकासाचे विषय, नागरी समस्या आणि त्या अनुषंगाने प्रचाराची रणनिती विषयावर चर्चा झाल्याचे उपस्थित नेत्यांनी सांगितले. या भेटीच्यावेळी मनसेचे आमदार प्रमोद पाटील, मनसेचे नेते अविनाश जाधव, अभिजीत पानसे, डी. के. म्हात्रे इतर मान्यवर उपस्थित होते.