ठाणे : तब्येत बरी नसल्याने वक्फ बोर्ड निर्णयाच्या मतदानावेळी मी उपस्थित राहू शकलो नाही. मात्र, विरोधक माझी बदनामी करून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केला. माझी बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या विरोधात समाजमाध्यमांवर संदेश पसरवले जात आहेत. मी वक्फ बोर्ड समितीचा सदस्य असल्याने प्रत्येक वेळी समितीच्या सभेत उपस्थित राहून या विधेयकाबाबत आमच्या पक्षाची व माझी भूमिका मांडली आहे असेही स्पष्टीकरण बाळ्या मामा यांनी दिले.
वक्फ बोर्डच्या मतदानादिवशी संसदेत गैरहजर झाल्याने बाळ्या मामा यांच्याविषयी भिवंडीत समाजमाध्यमांवर विविध संदेश प्रसारित होत होते. याविषयावर सविस्तर माहिती देण्यासाठी बाळ्या मामा यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर टीका केला. मी ठाण्यातील संपदा रुग्णालयात दाखल होतो. त्यामुळे मी वक्फ बोर्डच्या मतदानावेळी संसदेत जाऊ शकलो नाही. याच, दरम्यान विरोधकांनी माझ्या बदनामीच्या बातम्या पसरविल्या. तसेच मी प्रमुख विश्वस्थ असलेल्या कार्ला येथील श्री एकविरा देवी यात्रेच्या बैठकीला देखील हजर नव्हतो, त्यावेळी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये काही समाजकंटकांनी माझ्यावर खालच्या पातळीवर टिका केली होती. मी आजारी असल्यामुळे बदनामी बाबतची माहिती देखील मिळत नव्हती. आता याची रितसर तक्रार भिवंडी पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार दिली आहे असा दावा बाळ्या मामा यांनी केला.
जाणीवपूर्वक बदनामी
वक्फ बोर्ड बिलाच्या मातदानादिवशी गैरहजर राहिल्याने विरोधकांनी माझी बदनामी करण्याच्या हेतूने मेसेज पसरवले, मी वक्फ बोर्ड समितीचा सदस्य असल्याने प्रत्येक वेळी समितीच्या सभेत उपस्थित राहून या विधेयकाबाबत आमच्या पक्षाची व माझी भूमिका मांडली आहे असेही म्हात्रे यांनी सांगितले.
हे कोणी केले मला माहीत आहे…
विरोधकांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये. हे कोणी केले आहे हे मला माहित आहे, ते माजी नेते आहेत. माझ्या विरोधात विष पेरले गेले आहे. हे विधेयक अचानक चर्चेसाठी आले होते. केवळ तब्बेत बरी नसल्याने मला या मतदानाला उपस्थित राहता आले नाही. मात्र विरोधकांनी याच बाबीचा फायदा घेऊन माझी बदनामी करून दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आपण आपल्या कामांच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देऊ व वक्फ बोर्डाच्या निर्णयासंदर्भात पक्ष व पक्षश्रेष्ठी जी भूमिका घेतली त्याबाजूने ठाम उभा राहू असेही खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले.