ठाणे : भिवंडी शहरातील हाॅटेल आणि बारमधील कचरा, शिल्लक राहीलेले अन्न याचा कचरा दैनंदिन स्वरुपात हाॅटेलबाहेर फेकण्यात येत असल्याची बाब नवनियुक्त पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या निदर्शनास आली असून त्याची गंभीर दखल घेत त्यांनी मंगळवारी उपहारगृह मालकांच्या संघटनेबरोबर बैठक घेऊन कचऱ्याच्या डब्यांमध्येच कचरा टाकण्याची सुचना केली आहे. तसेच सर्व व्यावसायीक आस्थापनांसाठी घंटागाडीच्या वेळा आणि मार्ग निश्चीत करुन दिवसातुन दोन वेळा कचरा गोळा करावा अशा सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी शहर स्वच्छतेवर भर देण्यास सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शहरातील सर्व हॉटेल,बार, परमीट रुम मालक आणि त्यांच्या संघटनांसोबत बैठक घेतली. या बैठकीस अतिरीक्त आयुक्त देवीदास पवार, उपायुक्त (आरोग्य) शैलेश दोंदे, जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि हॉटेल, बार आणि परमीट मालक तसेच त्यांचे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. हॉटेल मधील कचरा, शिल्लक राहीलेले किंवा वाया गेलेले अन्न याचा कचरा दैनंदिन स्वरुपात हॉटेल बाहेर फेकण्यात येत असल्याची बाब आयुक्त सागर यांच्या निदर्शनास आली होती. त्याची दखल घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी बैठक आयोजीत केली होती. शहर स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची आहेच. पण, त्याचबरोबर हॉटेल, बार, परमीट रुम मालक हे देखील शहराचे भागधारक आहेत. त्यामुळे त्यांच्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही त्यांची सुद्धा असणार आहे, असे त्यांनी बैठकीत सांगितले.
हॉटेल, बार, परमीट रुम चालक, मालक या सर्वांनी त्यांचे गाळ्याच्याबाहेर ओला कचरा आणि सुका कचरा यासाठी मोठे कचरा डबे ठेवावेत. तसेच त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा त्यांनीच वर्गवारी करुन त्या डब्यांमध्ये टाकावा, अशा सुचनाही त्यांनी केल्या. यापुढे सर्व आरोग्य निरीक्षकांनी दोन ते तीन वेळा अचानक भेटी देऊन कचरा वर्गीकरणासाठी डब्बे ठेवले आहेत की नाही, तसेच, कचऱ्याचे वर्गीकरण होत आहे किंवा नाही याची पहाणी करावी. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी घंटा गाडीने कचरा गोळा केल्यावर पुन:श्च मधल्या कालावधीत जमा होणाऱ्या कचऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सुचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
दररोज घंटागाडी उपलब्ध झाली पाहीजे, अशी मागणी हॉटेल मालकांनी यावेळी केली. तसेच, स्वच्छतेबाबत हॉटेल मालक देखील आग्रही असतात. परंतु अनेकवेळा नागरीक देखील हुज्जत घालत असल्याने त्यांचा नाईलाज होतो, असेही हाॅटेल मालकांनी सांगितले. त्यावर अशा वेळी त्या त्या क्षेत्रातील आरोग्य निरीक्षकला कळविण्यात यावे. महापालिकेकडून त्यांना सहकार्य केले जाईल, असे आयुक्त सागर यांनी सांगितले.
नो वेस्ट झोन
यापुढे ज्या क्षेत्रात सलग हॉटेल, खानावळ, बार असतील, त्या क्षेत्राला नो वेस्ट झोन म्हणून घोषीत केले जाईल. त्या ठिकाणी हॉटेल संघटनेच्या सहकार्याने सुशोभीकरण करण्यात येईल. तसेच, यापुढे सर्व व्यावसायीक आस्थापनांसाठी घंटागाडीच्या वेळा आणि मार्ग निश्चीत करुन दिवसातुन दोन वेळा कचरा गोळा केला जाईल, असे आश्वासनही आयुक्तांनी दिले.