ठाणे : भिवंडी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अनमोल सागर (भा.प्र.से.) यांनी बुधवारी आयुक्त पदाचा पदभार स्विकारला. यापूर्वी ते लातूर जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी होते. भिवंडी महापालिकेचे ते २३ वे आयुक्त आहेत. जे अधिकारी जाणीवपुर्वक एखादे काम करण्यास टाळाटाळ करीत असतील त्यांना कोणत्याही प्रकारे क्षमा केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. तसेच, महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविणे आणि कर वसुली १०० टक्के करणे यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
भिवंडी महापालिका आयुक्तपदाचा पदभार बुधवारी अनमोल सागर यांनी स्विकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व विभाग प्रमुख आणि नियंत्रण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यापुढे सर्वांनी मिळून काम करायचे असून, जनमानसात महापालिकेची एक चांगली आणि सकारात्मक प्रतिमा तयार करण्याबाबत भाष्य त्यांनी केले. प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याने त्यांच्या कामात शिस्त आणि प्रामाणिकपणा पाळलाच पाहिजे. तसेच, कर्मचाऱ्यांनी वेळेत आणि गुणवत्तापुर्ण करणे आवश्यक आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याचा कामाच्या गुणवत्तेमधील जाणीवपुर्वक हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही अशा इशाराही त्यांनी दिला. तसेच, महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविणे आणि कर वसुली १०० टक्के करणे यावर लक्ष केंद्रीत करण्याचे त्यांनी सूचित केले. कोणत्याही प्रकारे महापालिकेच्या पैशांचा अपव्यय सहन केला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
विविध विभागात एखाद्या कामाबाबत संदिग्धता दिसून आल्यास किंवा काम कोणी करावे याबाबत संभ्रम निर्माण होतो त्या सर्व बाबींबाबत एकसुत्रीपणा आणणे गरजेचे आहे. आपली नियमीत कामासोबतच प्रत्येक विभागाने एक नाविन्यपुर्ण प्रकल्प सादर करावा. त्यावर विचार विनीमय करुन ते काम पुर्णत्वास नेले जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच, माझ्या कामाची पद्धत म्हणजे मी जे काम सोपवितो त्याचा सातत्याने काम पुर्ण होईपर्यंत पाठपुरावा करतो. प्रत्येक विभागाने त्यांचे विभागाचे तातडीचे प्रश्न, दिर्घकालीन प्रश्न काही असतील तर ते सादर करावे. त्यावर मार्ग काढून त्यांचे निराकरण केले जाईल. तसेच, प्रत्येक विभागाने काही चांगले काम केल्यास अथवा प्रस्तावित असल्यास ते तातडीने निदर्शनास आणावे अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. जे अधिकारी जाणीवपुर्वक एखादे काम करण्यास टाळाटाळ करतील त्यांना कोणत्याही प्रकारे क्षमा केली जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. नागरीकांकरिता आठवड्याचे पाचही दिवस पुर्णवेळ उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.