कल्याण- मुंबई-अहमदाबाद, मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या वेळेत मालवाहू ट्रक, इतर वाहने पिस्तुलचा धाक, गोळीबार करुन अडवायची. या वाहनांच्या चालकांना बेदम मारहाण करुन ट्रक सामानासह घेऊन पळून जायाचे. या वाहनांची काळ्या बाजारात वाहन क्रमांक बदलून विक्री करायची. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कार्यपध्दतीने महामार्गावरील वाहनांना लुटणाऱ्या ११ जणांच्या एका टोळीला भिवंडी पोलिसांनी कौशल्याने अटक केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भिवंडी पोलीस या टोळीचा माग काढत होते. या टोळीचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी दक्षिणी राज्यात आरोपींना शोधण्यासाठी विशेष तपास पथके तयार केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिवंडी येथून आठ टन तांबे घेऊन एक ट्रक गुजरातच्या दिशेने रात्रीच्या वेळेत गेल्या महिन्यात निघाला होता. या ट्रकला महामार्गावर एका टोळीने अडविले. चालकाला पिस्तुलचा धाक दाखवून हवेत गोळीबार केला. टोळीने चालकाला ट्रक मधून ढकलून देऊन ट्रकचा ताबा घेऊन पळून गेले होते. भिवंडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गु्न्हा दाखल झाला होता.पोलीस उपअधीक्षक जितेंद्र आगरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, साहाय्यक उपनिरीक्षक पी. के. तोडासे हवालदार एम. एल. काळढोके, ट्रक लुटमारीचा तपास करत होते. हा तपास करताना पथकाला अहमदाबाद मार्गावर अशाच प्रकारचे ट्रक, इतर वाहने लुटमारीच्या घटना घडत आहेत अशी माहिती मिळाली.

तपास करताना भिवंडी पोलिसांना मानखुर्द येथे चोरीचे ट्रक पळवून नेले जातात अशी गुप्त माहिती मिळाली. पथकाने मानखुर्द भागात तळ ठोकून तपास सुरू केला. त्यांना इम्रान बन्ने खान (रा. गोवंडी), मोहम्मद एजाज शमाम अन्सारी, धीरजकुमार उमेश चौधरी (रा. मुझ्झफरपूर, बिहार) यांनी एक ट्रक मानखुर्द मध्ये आणला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या तिघांचा माग काढून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी महामार्गावर वाहनांवर दरोडे टाकून वाहने, त्यामधील सामान लुटत असल्याची माहिती पोलिसांना दिली. भिवंडी जवळील लुटमारीचा प्रकार या टोळीने केला होता.या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नीरज बजरंग सिंग (रा. सुरत), नवीन कुमार झा (रा. नालासोपारा), जाॅम कलीम खान (रा. नवी मुंबई), वसीम रमजानी मंसुरी (रा. शीव, मुंबई), जीवन रमेश जाधव, यश महेंद्र भारती (रा. सुकाळी, जि. यवतमाळ), राजसिंह धनसुख गुजर (रा. बिकानेर, राजस्थान), विनोद सहानी (रा. बिहार) यांना अटक करण्यात आली आहे. राजसिंह, विनोद हे टोळीचे म्होरके आहेत. त्यांना तेलंगणा, बिहार मधून अटक करण्यात आली आहे.

या टोळीच्या ताब्यातून एक ट्रक, तीन दुचाकी, रिक्षा अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या टोळीने महाड, नवी मुंबई, रबाळे हद्दीत वाहन चोरीचे प्रकार केले आहेत. या आरोपींना न्यायालयाच्या आदेशा वरुन पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीने आतापर्यंत आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास भिवंडी पोलीस करत आहेत. भिवंडी पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीला पकडण्यात यश मिळविल्याने वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे. आपल्या हद्दीतील वाहने या टोळीने चोरीला आहेत का याची विचारणा इतर पोलीस ठाण्यांकडून भिवंडी पोलिसांना करण्यात येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi police arrested an inter state gang of 11 people who robbed vehicles on the highway amy
Show comments