जिल्ह्यातील भिवंडी, ठाणे आणि मुरबाड तालुक्यात कोयना बाधितांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर भूमाफियांनी आणि काही ठिकाणी स्थानिकांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते. यातील ठाणे तालुक्यातील पिंपरी गावातील अतिक्रमण हटवून दिवाळीनंतर बाधितांना जागेचा ताबा देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली सुरु झालेल्या नाहीत तर, भिवंडी आणि मुरबाड मधील जागेवरील अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाने सुरुवातही केलेली नाही. यामुळे मागील पाच दशकापासून हक्काची जागा मिळण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या बाधितांचे यंदाचे वर्ष देखील प्रतिक्षेतच जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीत रविवारी युवा साहित्य नाट्य संमेलन; ज्येष्ठ अभिनेत्री संपदा जोगळेकर संमेलनाध्यक्षा
ठाणे जिल्ह्यातील कोयना बाधितांसाठी ठाणे, भिवंडी तालुक्यात १८१ हेक्टर आणि मुरबाड तालुक्यात ११७ हेक्टर जमीन मंजूर करण्यात आली होती. यातील भिवंडी आणि ठाणे तालुक्यातील १८१ हेक्टर जागेवर भूमाफियांकडून अनधिकृतरित्या गोदामे, चाळी उभारण्यात आल्या होत्या. यातील ठाणे तालुक्यातील पिंपरी गावातील काही हेक्टर जागेवरील अतिक्रमण हटविण्यास जिल्हा पुनर्वसन विभागाने जून महिन्यात सुरुवात केली होती. त्यानंतर पावसाचे कारण देत प्रशासनाने कारवाई थांबविली. यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा धडक कारवाई करत जिल्हा पुनर्वसन विभागाने भूमाफियांची गोदामे जमीनदोस्त केली होती. तर अतिक्रमण हटविलेल्या जागेचा ताबा बाधितांना दिवाळीनंतर देण्यात येणार असल्याचे प्रशासनानाने स्पष्ट केले होते. मात्र ताबा देण्याबाबत राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला नसल्याने बाधितांना अद्याप जागेचा ताबा देण्यात आलेला नाही. पिंपरी येथील उर्वरित जागा शेतीमध्ये असल्याने सध्या त्यावर भात पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. यामुळे काढणी झाल्यावर त्या जागेचा ताबा मिळविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर भिवंडीमध्ये देखील मोठया प्रमाणावर आरक्षित जागेवर अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अद्याप नियोजन देखील केले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्यास सातत्याने होत असलेल्या विलंबामुळे बाधितांचे मागील ५८ वर्षांप्रमाणे हे वर्ष देखील हक्काची जमीन मिळण्याच्या प्रतिक्षेतच गेले असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा >>>ठाणे ग्रामीण परिसर दोन वर्षात पाणी टंचाई मुक्त होणार?
मुरबाड जागेचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित
ठाणे आणि भिवंडी तालुक्यांबरोबरच मुरबाड तालुक्यातही कोयना प्रकल्पबाधितांसाठी ११७ हेक्टर शेतजमीन राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र शासनाने राखीव म्हणून घोषित केलेली ही जागा मागील अनेक दशक ग्रामस्थ राखत असल्याने त्यांनी ती जागा देण्यास विरोध केला आहे. काही महिन्यापूर्वी जागेची मोजणी करण्याकरीता गेलेल्या अधिकारी वर्गाला देखील ग्रामस्थांनी माघारी पाठवले होते. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे अहवाल पाठविला आहे. मात्र त्यावर देखील अदयाप कोणताही प्रतिसाद आले नसल्याचे दिसून आले आहे.