ठाणे : ठाणे जिल्ह्यातील काँग्रेससाठी एकमेव पोषक मानला जाणाऱ्या भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात पक्षाने ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांना उमेदवारी जाहीर करून पुन्हा एकदा बंडाची धग ओढावून घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीला ६० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. यावेळी येथून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन आणि माजी नगरसेवक विलास पाटील या दोन स्थानिक उमेदवारांनी दावा सांगितला होता. असे असतानाच, भिवंडी ग्रामीणमध्ये वास्तव्यास असलेल्या चोरघे यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने बंडाचा ताप ओढवून घेतल्याची चर्चा आता रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीत हेच चोरघे निवडणूक लढवतील असे चित्र होते. मात्र, शरद पवार यांनी ऐनवेळेस हा मतदारसंघ पदरात पाडून घेतला आणि येथून पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे हे खासदार झाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे दरम्यान दयानंद चोरघे यांनी भिवंडी परिसरात मोठी मेहनत घेतली होती. येथील आयोजनात त्यांची भूमिका निर्णायक मानली गेली. त्यामुळे भिवंडी लोकसभेवर त्यांनी दावा सांगितला होता. मोठ्या पवारांनी हा दावा हाणून पाडलाच शिवाय भिवंडीची जागाही पदरात पाडून घेतली. तेव्हापासून अस्वस्थ असलेल्या चोरघे यांनी भिवंडी पश्चिम मतदारसंघावर दावा ठोकला होता. पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले मतदान झाले होते. सध्या येथे भाजपचे महेश चौघुले हे आमदार आहेत. महेश चौघुले आणि भाजपचे माजी खासदार कपिल पाटील यांच्यामध्ये विस्तव देखील जात नाही. त्यामुळे मुस्लिम बहुल असलेला हा मतदारसंघ चौघुले यांच्यासाठी कठीण असल्याचे बोलले जाते. ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीत काँग्रेसला मिरा भाईंदर, भिवंडी पश्चिम अशा दोनच जागा सुटल्या आहेत. या जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाही. भिवंडीत यावेळी काँग्रेसला विजयाची आशा आहे. माजी आमदार रशीद ताहीर मोमीन आणि विलास पाटील या दोघांचाही यावेळी येथून दावा होता. दोघेही तगडे आणि प्रभावी उमेदवार मानले जात होते.

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यात दोन आमदारांची फरफट, महायुतीने नाकारले, इतरांनीही झिडकारले

भिवंडी पश्चिमेत मुस्लिम उमेदवारांच्या भाऊ गर्दीत चौघुले निवडून येतात असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे काँग्रेस हे मतविभाजन टाळण्यासाठी हुषारीने पावले उचलेल अशी आशा होती. चोरघे यांची उमेदवारी जाहीर होताच पक्षात पुन्हा एकदा बंडाचे वारे वाहू लागले असून रशीद ताहीर मोमीन आणि विलास पाटील या दोघांनीही त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. या मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी तब्बल १८ जण इच्छुक होते. शनिवारी रात्री दयानंद चोरघे यांना उमेदवारी मिळाल्याचे वृत्त मोमीन यांना समजल्यानंतर त्यांनी भिवंडीतील माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच उघडपणे चोरघे यांच्या उमेदवारीविषयी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – हिंगणघाटमधून आघाडीचे अतुल वांदिले, तैलिक संघटनेच्या प्रभावाने तीन उमेदवार

दयानंद चोरघे हे भिवंडी ग्रामीण मतदारसंघात राहतात. त्यामुळे चोरघे हे बाहेरील उमेदवार आहेत. भिवंडी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघात भिवंडीतील स्थानिक उमेदवार देण्यात आलेला नाही. भिवंडीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. – रशीद ताहीर मोमीन, माजी आमदार.