ठाणे : भिवंडी येथे बाराशे रुपये चोरल्याच्या संशयातून एका मजूराची त्याच्याच दोन सहकाऱ्यांनी लोखंडी वस्तूने मारहाण करुन हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात बैतुल्ला खान आणि अजय या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.भिवंडी येथील वेहळे गाव भागातील एका मंडप व्यवसायिकाकडे अनिल बृजलाल (३६). बैतुल्ला खान, अजय यांच्यासह पाच ते सहा कामगार रोजंदारीवर कामाला आहेत.
मंडप व्यवसायिकाच्या गोदामामध्येच ते राहत होते. होळी आणि धुलिवंदनाच्या निमित्ताने सुट्टी असल्याने अनिल, बैतुल्ला आणि अजय वगळता इतर कामगार बाहेर गेले होते. धुलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी अनिल याला बेदम मारहाण झाली होती. त्याचा चेहरा सुजलेला होता. याबाबतची माहिती मंडप व्यवसायिकाला मिळाल्यानंतर त्यांनी अनिल याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. अनिल याला कोणी मारले याबाबत अजय आणि बैतुल्ला यांना मंडप व्यवसायिकाने विचारले असता, अनिल याने त्याचे बाराशे रुपये चोरल्याने त्याला मारहाण केल्याचे बैतुल्ला याने सांगितले.
दरम्यान, रात्री १० वाजताच्या सुमारास अनिल याची उपचारा दरम्यान प्रकृती बिघडली. शनिवारी मध्यरात्री अनिलचा मृत्यू झाला. मंडप व्यवसायिकाने गोदामामधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, अनिल यास अजय आणि बैतुल्ला यांनी लोखंडी वस्तूने मारहाण केल्याचे दिसले. त्यानंतर मंडप व्यवसायिकाने याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.