लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळ सर्वाधिक वर्दळीच्या घनश्याम गुप्ते रस्त्यावर रेल्वे स्थानक सुशोभिकरण भूमिपूजनाचा मंडप भाजप-शिवसेनेकडून टाकण्यात आला आह. या मंडपामुळे या रस्त्यावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे. गुप्ते हा रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. हाच रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने प्रवासी, वाहन चालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

दिवाळीचा सण असल्याने डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील रस्ते, बाजारपेठा विक्रेत्यांनी भरून गेल्या आहेत. संध्याकाळी चार वाजल्यानंतर रेल्वे स्थानक भागात खरेदीसाठी तुफान गर्दी होत असल्याने या भागात पादचाऱ्यांना चालणे मुश्किल होते. गुरुवारी रात्री नऊ ते रात्री ११ वाजेपर्यंत डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता, गुप्ते रस्ता वाहन कोंड़ीच्या विळख्यात अडकला होता.

आणखी वाचा-ठाणे : उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी आव्हाडांची बॅनरबाजी

डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे प्रवेशव्दारांचे सुशोभिकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून केले जाणार आहे. या कामांचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता गुप्ते रस्त्यावरील जाहीर कार्यक्रमातून होणार आहे. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. दिवाळीचा सण असल्याने आणि गुप्ते रस्ता सर्वाधिक वर्दळीचा असल्याने हा कार्यक्रम पश्चिमेतील भागशाळा मैदानात घेण्यात यावा, म्हणजे कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी जागा मिळेल. रेल्वे स्थानक भागात कार्यकर्ते, पादचारी, वाहने एकाचवेळी आल्याने गुप्ते रस्त्यावर अभूतपूर्व कोंडी होईल, असे शहरातील काही जाणत्या मंडळींनी मंडप ठेकेदाराला, भाजप पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्याची दखल घेण्यात आली नाही.

ऐन सणासुदीत आमच्या दुकानांसमोर मंडप, ग्राहकांना येण्याचे जाण्याचे मार्ग बंद करण्यात आल्याने गुप्ते रस्ता भागातील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा-ठाणे : महापालिकेच्या २१७ अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान नाही

वळसा घेऊन स्थानकात

मंडपाजवळ एक रिक्षा, दुचाकी जाईल एवढाच रस्ता ठेवण्यात आला आहे. या अरूंद बोळातून वाहने येजा करत असल्याने गुप्ते रस्त्यावर कुळकर्णी ब्रदर्स दुकान भागात कोंडी होत आहे. कोंडीत अडकलेली वाहने रेल्वे स्थानक भागात जाण्यासाठी गोमांतक बेकरी भागातून दिनदयाळ रस्ता, डावे वळण घेऊन महात्मा फुले रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हे रस्ते अरूंद असल्याने या हे रस्ते कोंडीच्या विळख्यात अडकले आहेत. ऐन दिवाळीत खरेदीच्या उत्साहात राजकीय कार्यक्रम आयोजित केल्याने डोंबिवलीकर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

हा कार्यक्रम दोन तासासाठी आहे. कार्यक्रमानंतर तात्काळ मंडप काढून टाकला जाईल, असे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. या मंडप उभारणीसाठी वाहतूक विभागाकडे आयोजकांकडून अर्ज आला होता. त्याला परवानगी देण्यात आली आहे. कार्यक्रमामुळे या भागात वाहतुकीचे नियोजन केले आहे, असे डोंबिवली वाहतूक विभागाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ चव्हाण यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhoomipujan program pavilion by blocking gupte road in dombivli mrj
Show comments