डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा-भोपर गावच्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर २५ दिवसांपासून गावच्या प्रवेशव्दारावर कमान उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी २५ दिवसांपासून हा मुख्य वर्दळीचा रस्ता बंद ठेवण्यात आल्याने या भागातील नोकरदार, विद्यार्थी, पालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पर्यायी वळण रस्ता खड्डे, अरुंद असल्याने या रस्त्यावरुन येजा करुन रहिवासी त्रस्त झाले आहेत. डोंबिवलीतील गांधीनगर भागातून हनुमान मंदिर चौकातून देसलेपाडा, भोपर येथे जाण्यासाठीच्या रस्त्यावर भोपर ग्रामस्थांनी या कमानीचे काम सुरू केले आहे. अगोदरच नागरिक खड्डे, मुसळधार पाऊस, वाहन कोंडीने हैराण आहेत. त्यात २५ दिवसांपासून कमान बांधकामासाठी रस्ता बंद असल्याने रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
या कमान बांधणीला कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाने परवानगी दिली आहे. ही कमान किती दिवस बांधून पूर्ण करावी असे कोणतेही नियोजन नसल्याने अतिशय संथगतीने हे काम सुरू असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवासी, नोकरदारांनी केल्या आहेत. देसलेपाडा, भोपर येथे कमानीचे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रोटेक्स कंपनीचा रस्ता सुस्थितीत करा. मग हा रस्ता कमानीच्या कामासाठी बंद करा, अशी मागणी रिक्षा संघटनेचे संजय देसले यांनी पालिकेकडे गेल्या महिन्यात केली होती. बांधकाम आराखडे मंजुरीत व्यस्त असलेल्या नगररचना अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या विभागातील अधिकारी नागरिकांशी आमचे देणेघेणे नाही अशा अविर्भावात असतात. त्याचे चटके आता लोकांना बसत आहेत, असे रिक्षा संघटना पदाधिकारी देसले यांनी सांगितले.
या रस्ते मार्गावर शाळा, कंपन्या, नवीन गृहसंकुले आहेत. त्यांना पर्यायी रस्त्याचा अवलंब करुन जावे लागते. रात्रीच्या वेळेत या खड्डेमय रस्त्यावरुन येजा करताना नागरिकांचा तारांबळ उडते. शाळा चालक, पालक, विद्यार्थी या खड्ड्यामय रस्त्यांमुळे हैराण आहेत. कमानीचे काम लवकर पूर्ण करा म्हणून पालिका, वाहतूक विभाग तगादा लावत नसल्याने याविषयी सांगायचे कोणाला असे प्रश्न येथील नागरिकांना पडले आहेत. स्थानिक ग्रामस्थांकडून हे काम सुरू असल्याने याविषयी उघडपणे कोणी बोलण्यास तयार नाही.
हेही वाचा : डोंबिवलीत एमआयडीसीत उच्चदाब वीज वाहिनीचा स्फोट ; एक बंगल्यातील विद्युत यंत्रणा जळून खाक
भोपर देसलेपाडा रस्त्यावर कमानीच्या कामासाठी रस्ता बंद आहे याची आपणास माहिती नाही. याविषयी माहिती घेऊन रस्ता खुला करण्याविषयी प्रयत्न करते. – रोहिणी लोकरे , कार्यकारी अभियंता
नगररचना विभागाने भोपर रस्त्यावर कमान बांधण्यासाठी परवानगी दिली आहे. हे काम अनेक दिवस सुरू आहे. ते विहित वेळेत पूर्ण करण्यात येत नसल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. याविषयी आपण लवकरच संबंधितांना काम पूर्ण करण्याचे आदेश देत आहेत. – भारत पवार , साहाय्यक आयुक्त ,ई प्रभाग क्षेत्र
पालिकेने परवानगी दिल्यामुळे वाहतूक विभागाला रस्ता बंद करण्यासाठी मंजुरी द्यावी लागली. या संथगती कामाची माहिती घेऊन येत्या पाच दिवसात रस्ता खुला करण्याचे आदेश संबंधितांना देतो. -रवींद्र क्षीरसागर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,कोळसेवाडी वाहतूक विभाग