ठाणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यात १०० दिवसांचा कृती आराखडा आखण्यात आला आहे. या आराखड्यानुसार सर्व शासकीय कार्यालयात कामकाज करण्यात येत असून यामुळे प्रशासकीय कामकाज वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे. या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतगर्त ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आज, गुरुवार एकाच दिवशी १६ हजार ९०३ घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या १०० दिवसाच्या कालावधीत संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी व सुविधा, गुंतवणूक प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या मुद्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश राज्यातील सर्व क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, सर्व जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज केले जात आहे. यामुळे कामकाजाला गती मिळाली असून काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे.
यामध्ये महा आवास अभियान सन २०२४-२५ अंतर्गत घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे, मंजुर घरकुलांना पहिला हप्ता वितरीत करणे, सर्व घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे हे उपक्रम १०० दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट आहेत. त्यानुसार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार जिल्हयात सर्वत्र एकाच दिवशी १६ हजार ९०३ घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम सर्व ग्रामपंचायत स्तरावर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत १२ हजार ८०२, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान अंतर्गत ३ हजार ४९२,राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत ५१८ आणि रमाई आवास योजनेअंतर्गत ९१ असे एकूण १६ हजार ९०३ घरकुल लाभार्थ्यांचा भूमीपूजन कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर संपन्न झाला.