|| ऋषीकेश मुळे

महापालिकेच्या प्रकल्पाला फारसा प्रतिसाद नसल्याचे महापौरांचे मत

ठाणे महापालिकेने गाजावाजा करत सुरू केलेल्या सायकल प्रकल्पाला रहिवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या वक्तव्यामुळे प्रकल्पाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संबंधित संस्थेने मात्र उत्तम प्रतिसाद असून १२ हजार वापरकर्त्यांची नोंद असल्याचा दावा केला आहे.

पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात भाडय़ाने सायकल देण्याचा प्रकल्प आग्रहाने सुरू केला आहे. रोज ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्यांनी सायकलींचा वापर केला तर वाहतूककोंडी कमी होऊ शकेल, हा त्यामागचा उद्देश होता. महापालिकेने एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सायकली भाडय़ाने देण्याचा प्रकल्प आखला. गेले वर्षभर तो राबवण्यात आला, शहरातील विविध भागांत सायकल थांबे उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पास अधिक प्रतिसाद मिळावा यासाठीही प्रयत्नही सुरू आहेत. असे असले तरी या प्रकल्पास ठाणेकरांनी अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला. थांब्यांची निवडही योग्य नाही, असे मत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

प्रकल्पप्रमुखांचे स्पष्टीकरण

सायकल सेवा प्रकल्पाचे प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी मात्र या प्रकल्पास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला. सध्या ठाणे शहरात ३५ सायकल प्रकल्प थांबे उभारण्यात आले आहेत. विवियाना मॉल, कोरम मॉल, रेमंड कंपनी, माजिवडा, पोखरण, वर्तकनगर आणि नितीन सेवा रस्ता यांसारख्या विविध ठिकाणी सायकल प्रकल्प थांबे आहेत. पुढील काही दिवसांत शहरात आणखी २५ सायकल प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ‘आय लव्ह सायकलिंग’ या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून पूर्वनोंदणी करून या सायकलींचा वापर करता येतो. सध्या ठाण्यात या सायकलींचे १२ हजार वापरकर्ते असून एकूण ५०० सायकली विविध थांब्यांवर उभ्या असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

सायकल प्रकल्पाला ठाणे शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिक सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी, शहरात फिरण्यासाठीही सायकलींचा वापर करीत आहेत. सध्या सायकल अ‍ॅप्लिकेशनचे १२ हजारांहून अधिक वापरकर्ते आहेत.    – प्रसाद कुलकर्णी, सायकल सेवा प्रकल्पप्रमुख

Story img Loader