लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: राष्ट्रवादी पक्षातील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाणे जिल्ह्यातून समर्थन मिळू लागले आहे. शरद पवार यांची साथ देणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेले ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांना समर्थन दिले असून त्याचबरोबर काही माजी नगरसेवकही त्यांना समर्थन देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या आव्हाड हे एकाकी पडले असून त्यांच्यापुढे पक्ष टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे शिवसेनापाठोपाठ वर्षभराने राष्ट्रवादीतही फुट पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातील कोणत्या गटाला आपले समर्थन आहे, हे पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येत आहे. अशाचप्रकारे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांना समर्थन दिले आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांना साथ दिली असून त्यांचे निकटवर्तीय म्हणून आनंद परांजपे हे ओळखले जातात. तर, नजीब मुल्ला हे एकेकाळी आव्हाडांचे कट्टर समर्थक होते. परंतु काही वर्षांपुर्वी ते त्यांच्यापासून दूरावले. त्यानंतर ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक झाले. या दोन्ही नेत्यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने ठाण्यातील राष्ट्रवादीत फुट पडली आहे. त्याचबरोबर काही माजी नगरसेवकही त्यांना समर्थन देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. निकटवर्तीयांनी साथ सोडल्याने ठाणे जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या आव्हाड हे एकाकी पडल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा-“शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी नाही”, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची स्पष्टोक्ती
नवा जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देणारे आनंद परांजपे यांना ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्या जागी ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई यांची तर कार्याध्यक्ष पदी प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर केली आहे.
जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नियुक्ती केली आहे. आम्ही पक्ष अद्याप सोडलेला नाही. त्यामुळे मीच पक्षाचा ठाणे जिल्हाध्यक्ष आहे. देसाई यांची नियुक्ती चुकीची आहे. -आनंद परांजपे, ठाणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी