ठाणे पट्टय़ातील बडी गृहसंकुले पुराच्या फेऱ्यात; लाखो रुपये खर्चून घरे घेणाऱ्यांना धास्ती

ऋषीकेश मुळे, ठाणे</strong>

राज्य सरकारने आखलेल्या विशेष नागरी वसाहतींच्या योजनेतून अधिकचा चटईक्षेत्र पदरात पाडून घेऊन ठाणे पट्टय़ात उभारण्यात आलेल्या नागरी वसाहतीही आता नियोजनातील कमतरतेच्या शिकार बनू लागल्या आहेत. निसर्गाच्या सान्निध्यातील घरांची स्वप्ने दाखवत ठाणे, डोंबिवली, बदलापूर, शीळ पट्टय़ात उभारण्यात आलेली बडी गृहसंकुले गेल्या दहा दिवसांत दोनदा पुराच्या फेऱ्यात अडकली. शीळ-कल्याण मार्गावरील पलावासह घोडबंदर रस्त्यावरील वसाहतींमध्ये आलेल्या पुराने येथील नियोजनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

घोडबंदर मार्गावरील अनेक वसाहतींत पावसाचे पाणी दरवर्षी साचते. या मार्गालगत पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक सुविधांची सदोष उभारणी हे याचे कारण असल्याचे सांगत महापालिकेने येथे नव्याने कल्व्हर्ट उभारण्याची कामे सुरू केली. मात्र, तरीही गेल्या आठवडाभरात दोन वेळा या वसाहतींत पाणी शिरले. डोंबिवलीलगत पलावा वसाहतीची अवस्थाही वेगळी नव्हती. लोढा पलावाचे कॅसा रिओ, टिटवाळ्यातील रिजन्सी सर्वम तसेच बदलापुरात नदीकिनारी उभ्या राहणाऱ्या अनेक प्रकल्पांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या. पलावा वसाहतीत बाजूनेच वाहणाऱ्या खाडीचे पाणी शिरल्यामुळे या ठिकाणी लाखो रुपये मोजून घरे घेणारे रहिवाशी कमालीचे धास्तावले आहेत. ठाण्यातील घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट परिसरालाही शनिवारच्या मुसळधार पावसाचा तडाखा बसला. पातलीपाडा येथील डोंगरावरून पाणी वाहून ते डोंगराच्या खालील बाजूस येते आणि हिरानंदानी इस्टेटच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पाणी उतारावरून आतील दिशेने वाहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, याच भागात असलेल्या महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानाचा परिसरही जलमय झाला होता.

टिटवाळा पूर्वेतील काळू नदीच्या काठी वसलेल्या रिजन्सी सर्वम या मोठय़ा गृहसंकुल वसाहतीमध्येही मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरले होते. भातसा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे काळू नदीच्या पात्रात वाढ होऊन नदीतील पाणी बाजूच्या रिजन्सी सर्वम संकुलात आले.

नैसर्गिक प्रवाह वगळल्याचा परिणाम?

कल्याण शीळ तसेच घोडबंदर मार्गालगत काही एकरांमध्ये नवी पसरट गृहसंकुले फेर धरून बांधली जात आहेत. मात्र ही उभारणी करत असताना नाले, ओढे, ओहळ, नद्यांचे प्रवाह बदलले जात आहेत, तर खाडय़ांमध्ये भरणी केली जात आहे, अशा तक्रारी यापूर्वीही पर्यावरणप्रेमींकडून पुढे आल्या आहेत. घोडबंदर भागात एका बडय़ा विकासकाकडून खाडीत मोठा भराव टाकला जात असताना महापालिका आणि जिल्हा प्रशासन डोळेझाक करते, अशाही तक्रारी आहेत. मलंगगडाच्या पायथ्याशी शेकडो एकर जमिनीवर जागोजागी हद्दीच्या सीमाभिंत टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील खोऱ्यातून वाहत येणारे पाणी शहरांमध्ये शिरू लागल्याच्या तक्रारी आहेत.

लोढा पलावाची दैना

डोंबिवली पूर्वेतील २०० हून अधिक बडय़ा इमारतींचा प्रकल्प असणाऱ्या लोढा पलावा भागात पुराच्या पाण्याने थैमान घातले. देसाई खाडीकिनारी वसलेल्या या प्रकल्पातील कासा रिओ आणि कॅसा रिओ गोल्ड या ७० ते ८० पेक्षा जास्त इमारतींच्या आणि बंगल्यांच्या गृहसंकुलात सहा फुटांहून अधिक पाणी साचले होते. बेवर्ली, डिओना, विवियाना, रिव्हर डेल, रिव्हर स्केप, रिव्हर रिट्रीट आणि रिव्हर व्ही या इमारतींचा तळमजला पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. गृहसंकुलाच्या बाजूने वाहणाऱ्या देसाई खाडीतील पाणी वाढून हे पाणी संकुलाच्या शेजारील संरक्षक भिंत ओलांडून संकुलात शिरल्याचे संकुलातील रहिवाशी मणिराजन यांनी सांगितले.

वीज, पाणी, दूध बंद

पावसामुळे पलावा संकुलातील वीजपुरवठा, इंटरनेट आणि टीव्ही केबल सुविधा पूर्णपणे बंद पडली होती. अनेक इमारतींच्या तळमजल्यापर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण बनले होते. रविवारी पहाटे खंडित झालेला वीजपुरवठा हा सोमवारी सकाळी सुरळीत झाल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

वाहनांमध्ये बिघाड

लोढा पलावाच्या इमारतींच्या परिसरात सहा फुटांहून अधिक पाणी साचल्याने वाहनांमध्ये पाणी गेले. परिणामी निम्म्याहून अधिक वाहने बंद पडली. सोमवारी सकाळी इमारतीच्या परिसरातील पाण्याचा निचरा झाल्यानंतर या ठिकाणी गॅरेज, वाहनांचे सव्‍‌र्हिस सेंटर आणि टोइंग करणारी वाहने यांची लगबग दिसून येत होती.