बदलापूर: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर बुधवारी पहाटेपर्यंत अखंडित सुरू होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बदलापूर शहर, कल्याण तालुका आणि उल्हासनगरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. तर काळू नदी इशारा पातळीवर वाहते आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास झपाट्याने पाणी पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या वर्षात उशिराने सुरू झालेला पाऊस जुलै महिन्यात बरसतो आहे. मंगळवारी भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. मंगळावरपासून ठाणे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळीनंतर पावसाचा जोर वाढला. मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी नद्या, नैसर्गिक आले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

हेही वाचा – वडपे-ठाणे महामार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी तातडीने उपायोजना राबवा

बुधवारी सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील काळू नदी टिटवाळा बंधाऱ्याजवळ इशारा पातळीवर वाहते आहे. काळू नदीची इशारा पातळी १०२ मीटर इतकी आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काळू नदी १०२.२० मिटर या पातळीवरून वाहत होती. काळू नदीची इशारा पातळी १०३.५० मीटर आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास काळू नदी धोक्याच्या पातळीवरून वाहण्याची शक्यता आहे. तर बदलापूर आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला ज्या नदीमुळे पुराचा फटका बसतो त्या उल्हास नदीच्या पाणी पातळी गेल्या २४ तासांत मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात पावसामुळे तारांबळ 

उल्हास नदीची इशारा पातळी १६.५० मीटर इतकी आहे. तर धोका पातळी १७.५० मीटर इतकी आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उल्हास नदी बदलापुरात १५.६० मीटर पातळीवरून वाहत होती. तर याच नदीवर जांभूळ आणि मोहन येथे नोंदवलेली नदीची पातळी इशारा पातळीच्या जवळ गेल्याचे दिसून आले आहे. असाच पाऊस कायम राहिल्यास तसेच रायगड जिल्ह्यातील नेरळ, माथेरान आणि कर्जत परिसरात मोठा पाऊस झाल्यास उल्हास नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big increase in water level of ulhas river kalu river at warning level continuous rain in thane district ssb