अंबरनाथमधील ज्येष्ठ नागरिकाकडून महासौरचूलची निर्मिती; दुर्गम भागातील सामूहिक स्वयंपाकासाठी उपयुक्त पर्याय
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या उक्तीतील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी योग्य मार्गाने केलेल्या प्रयत्नांद्वारे कोणतीही गोष्ट साध्य करता येऊ शकते. अंबरनाथ येथील एक ज्येष्ठ नागरिक विजय बर्वे यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. शेफलर यांच्या जर्मन बनावटीच्या महासौरचुलीपासून प्रेरणा घेत त्याला देशी जुगाडाची जोड देऊन त्यांनी साध्या, सोप्या तंत्रज्ञानाने सहजसाध्य होऊ शकणारी महासौरचूल बनवली आहे. विशेष म्हणजे या सौरचुलीसंदर्भात त्यांना दोन पेटंटही मिळाले असून अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) संस्थेनेही त्यांच्या या कामगिरीची दखल घेतली आहे. विज्ञान शाखेचे पदवीधर असलेल्या बर्वे यांनी सुरुवातीच्या काळात भाभा अणुशक्ती केंद्रात काही वर्षे कनिष्ठ वैज्ञानिक म्हणून नोकरी केली. त्या संशोधक वृत्तीचा त्यांना याकामी उपयोग झाला.
जंगलसंपदा उजाड होत असल्याने पारंपरिक चुलीसाठी लाकडे मिळणे मुश्कील झाले आहे. अशाप्रकारे इंधन म्हणून लाकडे जाळणे पर्यावरणविरोधीही आहे. मात्र स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस अद्याप दुर्गम भागात पोहोचू शकलेला नाही. अशा परिस्थितीत बर्वे यांनी शेफलर यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेली महासौरचूल अतिशय उपयुक्त आहे. तिरुपती, शिर्डी, माऊंट आबू येथील महाप्रसाद बनविल्या जाणाऱ्या भटारखान्यात शेफलर यांचीच महासौरचूल आहे.
शंभरेक माणसांच्या स्वयंपाकासाठी शेफलरच्या चुली व्यावहारिक ठरत नाहीत. त्या चुलींचे व्यवस्थापन पाहण्यासाठी एक पूर्णवेळ तंत्रज्ञ ठेवावा लागतो, तो परवडत नाही. मूळचे घडय़ाळ दुरुस्ती व्यवसायात असलेल्या बर्वेच्या ही गोष्ट लक्षात आली. कानसई विभागातील त्यांच्या राहत्या इमारतीच्या गच्चीवर त्यांचे प्राध्यापक मित्र भगवान चक्रदेव यांनी महासौरचूल बनविण्याचा पहिला प्रयोग १९९५ मध्ये केला. चक्रदेव सरांनी पुढे त्यातून लक्ष काढून घेतले. विजय बर्वे मात्र गेली दोन दशके महासौरचुलीविषयी सातत्याने प्रयोग करीत आहेत.
शेफलरच्या महासौरचुलीविषयी त्यांना कायम कुतूहल होते. सूर्याच्या गतीनुसार या चुलीचा कोन बदलतो आणि जास्तीत जास्त सौरऊर्जा मिळते. सुरुवातीला पुणे विद्यापीठातील शेफलरचे एक मॉडेल त्यांनी अभ्यासले. त्यानंतर योगायोगाने तारापूर येथील एका जर्मन सेवाभावी संस्थेतील शेफलर बनावटीची सौरचूल दुरुस्तीसाठी त्यांना बोलावण्यात आले. या सौरचुलीचे पॅनल घडय़ाळाच्या काटय़ांबरहुकूम फिरत होते. त्या घडाळ्यात बिघाड झाला होता. अशाच प्रकारे बदलापूर येथील एका आश्रमातील अशीच एक जर्मन बनावटीची महासौरचूल त्यांनी दुरुस्त केली. दुरुस्तीच्या या कामातून त्यांना शेफलरच्या सौरचुलीची वैशिष्टय़े तसेच त्याच्या मर्यादा लक्षात आल्या. त्यातले गुण घेऊन आणि दोष टाळून गावातील साध्या कारागिरालाही चालविता अथवा दुरुस्त करता येईल, अशी देशी महासौरचूल त्यांनी तयार केली. मधु आपटे, सुभाष वाड, किरण काशीकर, प्रा. संजय भंडारी आणि प्रा. भगवान चक्रदेव यांची मदत आणि मार्गदर्शनामुळे आपण इथपर्यंतचा पल्ला गाठू शकल्याचे बर्वे नमूद करतात.
व्यावहारिक वापरही यशस्वी
अनेक संशोधन प्रयोगापुरते मर्यादित राहते. विजय बर्वे यांच्या महासौरचुलीबाबत मात्र तसे झाले नाही. स्वत:च्या इमारतीच्या गच्चीवर त्यांनी शंभर किलो बटाटे उकडले. भात शिजविला. त्यानंतर अंबरनाथ येथील नॅब या अंध विद्यार्थ्यांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत त्याची चाचणी घेतली गेली. तेव्हा एका अंध विद्यार्थ्यांने गावातील चुलीवरल्या स्वयंपाकाची आठवण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर वनवासी कल्याण आश्रमाच्या मोखाडा येथील बेरिस्ता येथील आश्रमशाळेत बर्वेची महासौरचूल बसविण्यात आली. मोखाडा तालुक्यातील डोल्हारा येथील शाळेतही महासौरचूल बसवली.