माझ्याकडे काम करणारा एक माणूस मला म्हणाला, ‘आमच्या गावाला येताय का? पौष महिन्याच्या पौर्णिमेला यात्रा असते,’ मी म्हटलं, ‘अरे, अशा यात्रा आणि जत्रा पाहिल्यायत थोडय़ाफार, पण या ठिकाणी विशेष काय असतं!’ तसं तो म्हणाला, ‘इथे ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा ‘बैल बाजार’ भरतो आणि तो पण वर्षांतून एकदाच असतो.’ मनात म्हटलं, ‘काय बघायचं त्या बैल बाजारात? पण म्हटलं, भाजी बाजार नेहमीच बघतो, बैल बाजार कधी बघणार?’ दुसऱ्या दिवशी माझ्या माणसाला होकार कळवला.
‘म्हसा’ हे ठाणे जिल्ह्य़ाच्या मुरबाड तालुक्यातलं एक गाव. खांबलिंगेश्वर या शंकराच्या आणि म्हसोबाच्या एकत्रित देवळात खूप मोठी यात्रा असते. पौर्णिमेपासून पुढील आठ ते दहा दिवस येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते. यात्रेच्या निमित्ताने जत्राही असते. या जत्रेला जोडून असतो बैल बाजार.. हजारोंच्या संख्येने इथे बैल आणि म्हशी विकायला आणि विकत घ्यायला लोक येतात. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा, यात्रा आणि ‘बैल बाजार’ आजतागायत सुरू आहे.
४ जानेवारीला एक दिवस आधीच तिथे पोचलो आणि या ‘बैल बाजाराचा’ आवाका बघून थक्कच झालो, माझ्यासारख्या पूर्णपणे शहरी वातावरणात वाढलेल्या माणसाला हा अनुभव अत्यंत वेगळा होता! अंदाजे दोनेकशे एकर परिसरात हा बाजार भरतो. नाशिक, नगर, पुणे, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांतून बैल आणले जातात, हजारो पालं पडतात, आपली जनावरं दावणीला बांधून, तीन-चार बांबू उभारून त्यावर घोंगडं किंवा कापड टाकून तात्पुरता आसरा उभारला जातो. तेथेच विक्रेते राहतात, बाजूला चुलीवर स्वयंपाक केला जातो. देशावरील लोक ज्वारी-बाजरीच्या भाकऱ्या थापतात आणि कोकणातले लोक तांदळाच्या. संध्याकाळी उशिरा टेकडीवरून खाली बघितलं, तर छोटय़ा छोटय़ा हजारो चुली पेटलेल्या आणि वारा नसल्यामुळे त्यातून येणारा धूर आसमंतात सरळ वर जात होता. एवढं रमणीय दृश्य मी कधीच पाहिलं नव्हतं. पालांच्या बाजूने फेरफटका मारला. वेगवेगळे घरगुती मसाले आणि त्यांचे सुगंध.. त्यामुळे तोंडाला पाणी सुटलं. एखाद्या ठिकाणी जरा रेंगाळलं की ते कुटुंब हमखास आपुलकीने जेवायला बोलवायचं. ‘या ना, जेवा आमच्या बरोबर’ ही आपुलकी मी प्रथमच अनुभवत होतो.
बैलांच्या अनेकविध जाती. गीर, कोकणी, खिल्लारी, देशावरचे, जर्सी, डांगी वगरे वगरे. बैलांचे रंग हा एक वेगळा विषय आहे. ढवळा म्हणजे पांढरा रंग, ऐंशी टक्के बैल हे ढवळे होते. मनेरा म्हणजे पांढऱ्यावर फिक्या रंगाचे काळे ठिपके, तर काबरा बांडा म्हणजे पांढऱ्या रंगावर गडद रंगाचे काळे ठिपके, तांबडा म्हणजे मातकट रंगाचा आणि खैरा म्हणजे पांढरा आणि तपकिरी रंगाचा बैल. बैलांची िशगं आणि विशडं हे अत्यंत दिमाखदार अवयव, त्यावरून बैलाचा भारदस्तपणा, त्याची किंमत ठरते. बैलांची िशगं तासून सुबक करणारे एक कलाकार भेटले. कानस, विळती, रंधा अशा हत्यारांनी बैलांची िशगं सुबक करण्याची ही कला आता फार थोडय़ा लोकांकडे बाकी आहे. बैलाचं वय ठरवण्यासाठी त्यांचे दात बघितले जातात. बैलांना फक्त खालचे दात असतात, वरचे नसतात, हा शोध माझ्यासारख्या शहरी माणसाला त्याच दिवशी लागला. दोन दात म्हणजे दोन ते तीन वर्षांचा, चार दात म्हणजे पाचएक वर्षांचा, तर आठ दात म्हणजे सातेक वर्षांचा बैल असं मानलं जातं. आठ दात म्हणजे पूर्ण वाढलेला बैल.
बैलाचाही एक प्रकारे दाखवण्याचा कार्यक्रम इथं होत असतो. बैलात काही खोट नाही ना, हे दाखवण्याकरिता बैलाचा मालक बैलाच्या मागे उभा राहून चाबकाने ‘फट्टाक’ असा आवाज काढतो की बैल दचकून जोरात पुढे पळतो आणि त्या पळण्यावरून खरेदीदाराच्या सराईत नजरेला कळतं, की हा बैल कसा आहे ते! मग सौदा सुरू होतो. तळहातांच्या पंजांवर रुमाल टाकून किंमत सांगितली आणि समजली जाते. हाताचं एक बोट म्हणजे एक हजार. समजा, एका हाताची पाचही बोटं दोन वेळा दाबली तर किंमत दहा हजार आणि पाच वेळा दाबली तर पंचवीस हजार. बैल हे जास्तकरून जोडीने विकले जातात. जोडीची किंमत अंदाजे तीस हजारपासून ते लाख रुपयांपर्यंत असू शकते. एकदा का सौदा झाला की विकणारा आपल्या जनावराच्या पुठ्ठय़ावर जोरदार थाप मारतो, याचा अर्थ सौदा पक्का झाला, मग तो मागे फिरू शकत नाही! सर्व व्यवहार रोखीने होतात. एकदा का जनावर विकलं गेलं की विकत घेणारा व्यवहार करून ताबडतोब जनावरावर गुलाल उधळतो, गुलाल लागलेलं जनावर बघितलं की समजायचं, की सौदा झालाय. एका विकणाऱ्याकडून किंमत पक्की झाली, पण त्याची थाप काही पडत नव्हती! शेवटी त्यानं कशीबशी थाप मारली आणि त्याचा बांध फुटला. गुढघ्यावर तो बसून ढसाढसा रडला. नंतर कळलं, जन्मापासून वाढवलेली ती बैलजोडी कर्ज फेडण्याकरिता त्याला विकावी लागत होती, असे अनेक अनुभव इथं येतात. राजस्थानमध्ये पुष्कर या ठिकाणी उंटांचा बाजार भरतो, जगभरातील लोक तो अनुभवायला येतात. आपल्याकडे तसा आणि तेवढाच मोठा हा बाजार बघण्याकरता किमान ठाणे जिल्ह्यातील रहिवासीही फिरकू नयेत, याची खंत वाटली. ऑफ बीट टूर्स म्हणून टुरिझम कंपन्यांनी अशी टूर्स काढायला काहीच हरकत नाही.
– सुनील जोशी
मोबाइल : ९२२३३१९२१६ आणि ९८६९७२४९२९.
अनवट वाट बैल बाजाराची
माझ्याकडे काम करणारा एक माणूस मला म्हणाला, 'आमच्या गावाला येताय का? पौष महिन्याच्या पौर्णिमेला यात्रा असते,' मी म्हटलं, 'अरे, अशा यात्रा आणि जत्रा पाहिल्यायत थोडय़ाफार, पण या ठिकाणी विशेष काय असतं!' तसं तो म्हणाला, 'इथे ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा 'बैल …
First published on: 24-01-2015 at 12:31 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biggest bull market of thane district