लोकल गर्दीला कंटाळलेल्या, करोना काळात वाहतुकीचे साधन नसल्याने हक्काचे वाहन असावे म्हणून अनेक नोकरदारांनी दुचाकी वाहने खरेदी केली आहेत. कल्याण, डोंबिवलीमधून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकीचा वापर अनेक नोकरदार करतात. गेल्या काही दिवसांपासून या नोकरदारांच्या घराच्या ठिकाणी ठेवलेल्या दुचाकी चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे.

कल्याण, डोंबिवली भागात राहणारे पण ठाणे, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, शहापूर, मुरबाड, वाडा भागात नोकरी करणारे अनेक नोकरदार दुचाकी वाहनाने दररोज कामाच्या ठिकाणी प्रवास करतात. लोकलच्या गर्दीत धक्केबुक्के खात प्रवास करण्यापेक्षा हा प्रवास सुखकर वाटतो. काही नोकरदार भागीदारी पद्धतीने आणखी एक प्रवाशाला सोबतीला घेऊन प्रवास करतात. त्यामुळे निम्म पेट्रोल खर्चाचे पैसे मित्राकडून मिळतात.

करोना काळात नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाचे साधन नव्हते. लोकल वाहतूक बंद होती. अनेक नोकरदारांनी गेल्या दोन वर्षात दुचाकी वाहने खरेदी केली आहेत. हा प्रवास नोकरदारांना सुखकारक वाटतो. या दुचाकी वाहनांवर आता चोरांची नजर पडली आहे. त्यामुळे नोकरदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांनी वाहन खरेदीसाठी बँकांकडून कर्ज घेतली आहेत. त्याची परतफेड झाली नसताना दुचाकी चोरीला गेल्याने नोकरदार हैराण आहेत.

डोंबिवली पूर्वेतील नांदिवली रस्ता एकतानगरमध्ये सुदर्शन गावडे (२७) हे नोकरदार आहेत. त्यांची बजाज पल्सर दुचाकी ते नोकरीच्या ठिकाणी येजा करण्यासाठी वापरतात. घरा समोरील रस्त्यावर दुचाकी वाहन उभे करून ठेवले असताना रात्रीच्या वेळेत चोरट्याने बनावट चावीच्या साहाय्याने दुचाकी सुरू करून चोरून करून घेऊन गेला. सकाळी कामावर निघाले असताना सुदर्शन यांना परिसरात दुचाकी दिसली नाही. दुचाकीची चोरी झाल्याने त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी चिंचपाडा रस्ता येथे राहणाऱे नोकरदार मिलिंद खरे (४७) यांची घरा समोरील रस्त्यावर उभी करून ठेवलेली हिरोहोन्डा स्प्लेन्डर दुचाकी सार्वजनिक रस्त्यावरून चोरट्याने चोरून नेली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मिलिंद यांनी तक्रार दाखल केली आहे. नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी मिलिंद दुचाकीचा उपयोग करत होते. चोरीच्या दुचाकीचे इंजिन, वाहन क्रमांक बदलून त्या दुसऱ्या शहरात विकण्याचा चोरट्यांचा धंदा असतो. गेल्या पंधरा दिवसापूर्वी मानपाडा पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडले होते. वाढती बेरोजगारी, व्यसनांची हौस पूर्ण करण्यासाठी बेरोजगार युवक अशा चोऱ्या करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader