डोंबिवली : डोंबिवली शहर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून दुचाकी, सायकल चोरीचे प्रकार वाढले होते. डोंबिवलीतील चार पोलीस ठाण्यात वाहन मालकांकडून तक्रार दाखल होऊन गुन्हे दाखल होत होते. दररोज दोन ते तीन दुचाकी चोरीला जात होत्या. या दुचाकी चोरांनी पोलिसांची झोप उडवली होती. विष्णुनगर पोलिसांनी या दुचाकी चोरांच्या शोधासाठी विशेष तपास पथक तयार करुन सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून आरोपीला बुधवारी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद इसाक युनुस खान (५४, रा. शिंपी, स्नेहा सोसायटी, आजदे पाडा, शंकर मंदिराजवळ, घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व) असे आरोपीचे नाव आहे. खानकडून तीन लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० दुचाकी, एक सायकल जप्त केली. डोंबिवलीतील मानपाडा, रामनगर, टिळकनगर आणि विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यात मोहम्मद खानने एकूण ११ दुचाकी चोरीचे गुन्हे केले आहेत.

हेही वाचा… कल्याण जवळील नेवाळी पाडा येथे महावितरण कर्मचाऱ्यावर ग्रामस्थाचा हल्ला

डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्र नगर मधील गुरुसाई चरण सोसायटी मधील रहिवासी सिंधू जयकुमार पिल्ले (४३) यांनी आपली सायकल गेल्या आठवड्यात महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षा वाहनतळाच्या बाजुला उभी केली होती. तेथून त्या खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या परत आल्यावर त्यांना जागेवर सायकल नसल्याचे दिसले. त्यांनी शोध घेतला. कुठेही आढळून न आल्याने सिंधू यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
वाढत्या दुचाकी चोऱ्यांमुळे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवलीचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांना दुचाकी चोरांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुलदीप मोरे, एस. एन. नाईकरे, साहाय्यक उपनिरीक्षक एम. बी. सावंत, हवालदार शकील जमादार, राजेंद्र पाटणकर, संतोष कुरणे, भगवान सांगळे, कैलास घोलप, शकील तडवी, तुळशीराम लोखंडे, सचिन कांगुणे, विक्रम गवळी, कुंदन भामरे, शशिकांत रायसिंग, तुषार कमोदकर, सचिन वानखेडे यांची स्वतंत्र तपास पथके तयार केली होती.

हेही वाचा… ठाणे : कशेळी-काल्हेर भागात वाहतूक कोंडी ; बुधवारपासून विजेचा लपंडावही सुरू

सिंधू पिल्ले यांच्या सायकलचा शोध घेत असताना विष्णुनगर ठाण्यातील कुंदन भामरे यांना सायकल चोरणारा आरोपी ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने दोन दिवस तेथे सापळा लावला. बुधवारी दुपारी साध्या वेशात मोरे, भामरे ९० फुटी रस्ता भागात गस्त घालत असताना त्यांना एक इसम सायकल हातात घेऊन रस्त्याच्या बाजुला उभा होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याच्या जवळ थांबून ‘तू येथे काय करतोस, सायकल कोणाची आहे,’ अशी विचारणा करताच इसम बिथरला. तो समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने पोलिसांनी त्याला विष्णुनगर पोलीस ठाण्यात आणले.

हेही वाचा… डोंबिवली एमआयडीसीत सांडपाणी चेंबर फुटल्याने रसायनयुक्त पाणी रस्त्यावर

पोलिसांनी त्याची चौकशी सुरू करताच त्याने आपण डोंबिवली परिसरात एकूण नऊ दुचाकी, दोन सायकली चोऱल्या असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकींची किंमत तीन लाख ५० हजार रुपये आहे. विष्णुनगर ठाणे हद्दीत तीन, टिळकनगर एक, रामनगर पाच, मानपाडा ठाणे दोन दुचाकी आरोपीने चोरल्या आहेत. चोरलेल्या दुचाकी वाहन क्रमांक बदलून विकण्याच्या प्रयत्नात आरोपी खान होता. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike thief form azade village arrested in dombivli asj
Show comments