उल्हासनगरः रस्त्यांची झालेली दुरावस्था एका स्त्रीरोग तज्ज्ञाच्या जीवावर बेतली असतानाच उल्हासनगरात गेल्या आठवड्यात एका व्यक्तीला पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पुन्हा एकदा भुयारी गटार योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात एख दुचाकीस्वार आणि त्याचा सहप्रवासी पडल्याची घटना समोर आली आहे. सुमारे दहा फुट खड्ड्यात गेल्याने ते जखमीही झाले आहेत. मात्र या प्रकारानंतर उल्हासनगरातील रस्ते आहेत की मृत्यूचे सापळे असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
उल्हासनगर शहरात गेल्या काही महिन्यात रस्त्याच्या दुरास्थेमुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते, त्यामुळे व्यापला गेलेला रस्त्याचा भाग, परिणामी बदललेली वाहतूक, अपूऱ्या मार्गिका आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आता उल्हासनगरात नित्याची झाली आहे. त्यामुळे अंबरनाथ, बदलापुरातून कल्याणच्या दिशेने उल्हासनगरातून प्रवास करायचा असल्यास काही तासांचा कालावधी लागतो आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि श्रम खर्च होते आहे. वाहनचालक या सर्व कोंडीमुळे आधीच त्रस्त आहेत. उल्हासनगरवासियांनाही याचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यातच खराब झालेले रस्ते, खड्डे आणि बेजबाबदारपणे सुरू असलेल्या विकासकामे नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहेत.
दोन आठवड्यापूर्वी उल्हासनगरातील बोट क्लब भागात रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एक डॉक्टरचा खड्ड्यामुळे दुचाकीवरून पडून मृत्यू झाला होता. स्त्री रोगतज्ज्ञ असलेल्या या डॉक्टरांच्या मृत्यूमुळे शहरात संताप व्यक्त होत होता. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच शहरात खोदलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामात सुरक्षेची काळजी न घेतल्याने एक व्यक्ती पडून मृत्यूमुखी पडला होता. त्यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्यातच आता भुयारी गटार योजनेच्या कामामुळे खोदलेल्या खड्ड्यात एक दुचाकीस्वार आपल्या सहप्रवाशासह पडल्याचा प्रकार समोर आला आहे.
उल्हासनगर कॅम्प तीन भागात भुयारी गटार योजनेसाठी खोदलेल्या एका मोठ्या खड्ड्यात दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्ती थेट दहा फूट खोल खड्ड्यात पडले. त्यानंतर ते त्यात अडकले. या भागातला संपूर्ण रस्ता खोदलेला असतानाही येथे कोणतेही सुरक्षा भिंत किंवा इशारा फलक नव्हता. त्यामुळे रस्ता समजून त्यांनी गाडी पुढे नेल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर काही मिनिटे हे दोघेही खड्ड्या आणि चेंबरच्या मधोमध अडकून पडले होते. येथून जाणाऱ्या प्रवाशांनी तातडीने धाव घेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघेही सुखरूप बाहेर आले. मात्र अपघातात दोघेही जखमी झाले आहेत.